मुंबई : मुंबईकरांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत १,५०० वातानुकूलित विद्युत मिडी बस दाखल होणार आहेत. या बसच्या सहाय्याने बंद झालेल्या बेस्टच्या काही मार्गाच्या पुनरुज्जीवनासह नवीन अशा एकूण १२५ बसमार्गांची भर पडणार आहे. यामुळे सध्याच्या ४०० बसमार्गांची संख्या पुढच्या वर्षाअखेरपर्यंत ५,२५७ होणार आहे. तसेच, या मिडी बसमुळे शहराच्या अरुंद गल्ल्यांमध्येही बेस्टची सेवा पोहोचू शकणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने २०२७ पर्यंत शहरात १० हजार बस (म्हणजे दर १००० लोकसंख्येमागे ०.६ बस) चालवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बेस्टचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार बेस्टने सात हजार कोटीच्या १५०० मिडी विद्युत बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७च्या वर्ष अखेरपर्यत टप्प्याटप्प्याने या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पहिल्या टप्यातील सुमारे २५० विद्युत बस दाखल होण्याची शक्यता आहे. विशेषतः फिडर सेवा आणि ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’साठी डिझाइन केलेल्या, ९-मीटर विद्युत मिडी बस लहान (कॉम्पॅक्ट) आकारमानाच्या आहेत. त्यामुळे अरुंद रस्त्यांवर आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये त्यांची वाहतूक अधिक सुरळीत होईल. ४०० मिमी इतक्या अत्यंत कमी उंचीच्या असल्याने या बस व्हीलचेअर वापरकर्त्यांसह दिव्यांग प्रवाशांसाठी अधिक सुलभ असतील. या बस मेट्रो स्टेशन्स, रेल्वे स्थानक आणि प्रमुख वाहतूक केंद्रांना जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. ‘ग्रीनसेल मोबिलिटी’ ३१ पेक्षा जास्त प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या १,०५० , तर साई ग्रीन ३३१ प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या ४५० बस पुरविणार आहे.
बेस्ट सध्या २,८०० बसच्या साहाय्याने ४०० बस मार्ग चालवते.
विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग आणि पश्चिम उपनगरात सुविधा अरुंद रस्त्यावर सेवा नविन मिडी बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत विविध कारणांमुळे रद्द झालेल्या मार्गांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शहरातील ज्या भागात १२ मीटरच्या बस चालविणे एक आव्हान असते, अशा विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग आणि पश्चिम उपनगरांतील काही भागातील अरुंद, तीव्र उताराच्या रस्त्यांवरही बेस्टची सेवा धावू शकणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानयुक्त बस
नवीन बस प्रगत ‘लिथियम आयर्न फॉस्फेट’ बॅटरी तंत्रज्ञान, संपूर्ण ‘एअर सस्पेंशन’ प्रणाली आणि वेगवान ‘डायरेक्ट करंट चार्जिंग’ सुविधांनी सुसज्ज असतील. आधुनिक टेलिमॅटिक्सच्या एकत्रीकरणाद्वारे प्रवासी सुरक्षा आणि परिचालन कार्यक्षमतेलाही प्राधान्य दिले आहे. बसमध्ये ३६०-डिग्री सीसीटीव्ही, ‘इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ आणि बॅटरीमधील आग शोधून ती नियंत्रित करण्यासाठी तयार केलेली ‘फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम’ यांचा समावेश आहे.
