मुंबई : बेस्टने २०२२मध्ये दोन हजार १०० आणि वर्ष २०२४ मधील दोन हजार ४०० भाडेतत्वावरील बसच्या कंत्राटापैकी आतापर्यंत ७३४ आणि पीएमआय व स्वीच मोबिलिटीच्या २०० अशा एकूण ४९५० बसपैकी केवळ ९३४ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. कंत्राटदाराकडून बसचा वेळीच पुरवठा होत नसल्याने ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे. परिणामी, मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटामुळे बेस्टने स्वमालकीऐवजी भाडेतत्वावरील बस घेण्यावर भर दिला. राष्ट्रीय शुद्ध हवा अभियानांर्तगत विद्युत वातानुकूलित दोन हजार १०० बस घेण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने मे २०२२ मध्ये घेतला. व्यवस्थापनाने ईव्ही ट्रान्स कंपनीची निवड करून सर्व बस पुरविण्याचे कंत्राट दिले. वार्षिक किमान ७० हजार किलोमीटर अंतर गृहीत धरून अनुदानासह प्रतिकिमी ४६ रुपये ८१ पैसे दराने, तर अनुदानाशिवाय प्रतिकिलोमीटर ५६.८१ रुपये दराने या बस पुरविल्या जाणार होत्या. परंतु कंपनीने आतापर्यंत केवळ ६८५ बसचा बेस्टला पुरवठा केला आहे.
नीने स्वीकृती पत्र दिल्यापासून पहिल्या सहा महिन्यांत २५ टक्के , नवव्या महिन्यापर्यंत आणखी २५ टक्के, तर १२ महिन्यांत म्हणजे २० मे २०२३ पर्यंत उर्वरित ५० टक्के बस पुरवायच्या होत्या; परंतु कंपनीने ६८५ बस पुरविल्या आहेत. या कंपनीवर कारवाई करण्याऐवजी ‘बेस्ट’ने फेब्रुवारी २०२४ मध्ये नवीन दोन हजार ४०० बस पुरविण्याचे दुसरे कंत्राट दिले.
अवघ्या दोनच कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याने पूर्वीच्याच कंपनीलाच काम दिल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. परंतु या ताफ्यातील केवळ ४९ बसचा पुरवठा आतापर्यंत झालेला आहे. त्यामुळे बेस्टचे संबंधित अधिकारी, तसेच बस पुरविण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी आणि कामगार संघटनांकडून होत आहे. सध्या मालकीच्या केवळ २४९ बस आहेत. बेस्टच्या ताफ्यात एकूण २ हजार ७६० बस आहेत. त्यापैकी २ हजार ५११ बस भाडेतत्त्वावरील आहेत.
बसचे वेळापत्रक
| कंत्राटदार | बसची संख्या | ताफ्यात दाखल बस |
|---|---|---|
| ईव्ही ट्रान्स | २१०० | ६८५ |
| ईव्ही ट्रान्स | २४०० | ४९ |
| मुंबादेवी मोबिलिटी (पीएमआय) | २५० | १५० |
| स्विच मोबिलिटी डबल डेकर | २०० | ५० |
| एकूण | ४९५० | ९३४ |
बेस्टचा सध्याचा बसताफा
| प्रकार | संख्या |
|---|---|
| एकूण बसताफा | २७६० |
| भाडेतत्वावरील | २,५११ |
| स्वमालकीचा | २४९ |
| विद्युत (EV) | १,२९२ |
| सीएनजी | १,२२५ |
| डिझेल | २४३ |
