मुंबई : बेस्ट बसची संख्या घटत असल्याने गेल्या काही वर्षात बेस्टचे सुमारे १०० बस मार्ग बंद झाले आहेत. बस अभावी नाईलाजास्तव प्रवाशांनी आपला मोर्चा शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळविला असून शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची संख्या वाढली आहे. परिणामी, बेस्ट बसची संख्या वाढविण्याची आणि शहरातील विविध मार्गावर बस चालविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
घडयाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ फार महत्त्वाची आहे. मुंबईकर एका-एका मिनिटांचा विचार करतात. परंतु सध्या बेस्टच्या ताफयात केवळ २ हजार ६७६ बस आहेत. त्यातून दिवसाला २३ लाख प्रवासी प्रवास करतात. बसची संख्या कमी असल्याने शहरातील काही बस मार्ग बंद झाले आहेत. अनेक बस मार्गांवर बस ४५ ते ५० मिनिटांनी येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
प्रवाशांची ही गैरसोय शेअर रिक्षा-टॅक्सीसाठी पोषक ठरली आहे. शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची संख्या वाढत आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानक ते कार्यालय, गृह संकुलांदरम्यान शेअर रिक्षा-टॅक्सी धावतात. पूर्व आणि पश्चिम उपनगरात शेअर रिक्शा मोठ्या प्रमाणात धावतात. परंतु याकरिता मुंबईकरांना थोडे जादा पैसे मोजावे लागत आहेत.
बेस्टच्या किमान प्रवासासाठी १२ रुपये मोजावे लागतात. तेथे आता शेअर रिक्षासाठी प्रती प्रवासी १५ रुपये, तर टॅक्सीसाठी २० ते २५ रुपये द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडते . त्यातच एका घरातील तीन ते चार सदस्य कामानिमित्त, महाविद्यालयात जात असतील तर त्यांचा महिन्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळे बेस्टच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहेत.
दक्षिण मुंबईत शेअर टॅक्सी
चर्चगेट येथून कुलाबा, नरिमन पॉईंट आदी परिसरात बेस्टच्या बस जातात. पण त्या तुलनेत शेअर टॅक्सीची सेवा अधिक आहे. पटकन उपलब्ध होणाऱ्या शेअर टॅक्सीला प्रवासी पसंती देतात. काही प्रवासी चालत सीएसएमटी, चर्चगेट स्थानकापर्यंत जातात.
मेट्रोचा आधार
घाटकोपर – अंधेरीदरम्यान मेट्रो १ धावते. त्यामुळे या दरम्यानच्या प्रवाशांची रस्ते वाहतूक कोडींतून सुटका झाली असून त्यांना बससाठी वाट पहावी लागत नाही. सीएसएमटी – विधान भवन मेट्रो सुरु झाल्याने दक्षिण मुंबईतील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेस्टच्या बसमार्गांची संख्या
- मुंबई – ३८५
- नवी मुंबई – १२
- मीरा भाईदर – १०
- एकूण – ४०७
बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे असलेले प्रवासी आपसात ठरवून शेअर रिक्षा टॅक्सीने प्रवास करीत आहेत.या रिक्शा टॅक्सी मीटर प्रमाणे धावतात. शहरात शेअर रिक्शा टॅक्सीची मागणी वाढलेली आहे. – तंबी कुरियन, सरचिटणीस, रिक्षा मेन्स युनियन, मुंबई.
- रिक्षांची संख्या – साडे चार लाख
- टॅक्सी – २८ हजार
