मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसचा प्रवास धोकादायक बनू लागला आहे. सातत्याने अपघात होत असल्याने, प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्रालयाजवळ शुक्रवारी बेस्ट बसमधून धूर येत होता. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून, विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले आणि घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.

बेस्टची बस शुक्रवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांना घेऊन बॅकबे आगाराकडे जात होती. मंत्रालय सिग्नलजवळ बस येताच तिच्या मागील डाव्या बाजूच्या चाकामधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब बस चालकाच्या निदर्शनास आली. बस चालकाने तत्काळ बस थांबवून पाहणी केली आणि बसमधून विद्यार्थ्यांना उतरविण्यात आले. तसेच तात्काळ बॅकबे आगाराशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. बस बिघाडाची माहिती मिळताच आगारातून दुसरी बस आणि आवश्यक कर्मचारी घटनास्थळी रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचलेल्या दुसऱ्या बसमधून शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यात आले. प्राथमिक निरीक्षणानुसार, मागील डाव्या बाजूस तांत्रिक बिघाडामुळे बसमधून धूर येत होता. घटनास्थळी बेस्ट उपक्रमातील अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले. ही बस पुढील तपासणीसाठी बॅकबे आगारात पाठविण्यात आली, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.