मुंबई : बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या चर्चा सुरू झालेल्या असल्या तरी बेस्ट उपक्रमातील आजी माजी कामगारांची कृती समिती मात्र संपवर ठाम आहे. येत्या १८ जूनला कृती समितीने संपाचा इशारा दिला असून आजपासून प्रत्येक आगारात जाऊन द्वारसभा घेतल्या जाणार आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागाची दिवसेंदिवस अवस्था बिकट होत असून सेवानिवृत्त कामगारांची देणीही मिळत नसल्यामुळे आता बेस्टचे आजी-माजी कामगार एकटवले आहेत. बेस्ट उपक्रमातील तब्बल १२ संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली असून १८ जूनपर्यंत कामगारांच्या मागण्यांसदर्भात कोणताही ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा कृती समितीने दिला आहे.
गेल्या काही वर्षात बेस्ट उपक्रमाची दूरवस्था झाली असून संचित तूटही वाढत चालली आहे. परिवहन विभागात बेस्टच्या गाड्यांचा ताफा कमी होत असल्यामुळे सेवेवर परिणाम झाला आहे. एकेकाळी नफ्यात असलेला विद्युत विभागही तोट्यात गेला असून या विभागाच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे सेवा देणे हे उपक्रमाच्या हाताबाहेर गेले आहे. सेवानिवृत्त कामगारांची देणीही थकली आहेत.
न्यायालयाने आदेश देऊनही ही देणी अद्याप उपक्रमाने दिलेली नाहीत. महायुती सत्तेवर आल्यावर बेस्टच्या सगळ्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा कामगारांना होती. मात्र केंद्रात, राज्यात, महापालिकेत महायुतीचे सरकार असताना आणि बेस्टच्या क्रेडीट सोसायटीवरही भाजपचे वर्चस्व असतानाही कामगारांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे आता बेस्ट उपक्रमातील बारा संघटनांनी एकत्र एकत्र येऊन लढा देण्याचे ठरवले आहे.
कृती समितीने संपाचा इशारा दिल्यानंतर गेल्या मंगळवारी बेस्टच्या अध्यक्षा व महाव्यवस्थापकांसोबत कामगार नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत मागण्याबाबत समाधानकारक आश्वासने न मिळाल्यामुळे कृती समितीने संप करण्याची भूमिका जाहीर केली. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रम महापालिकेत विलीन करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे जाहीर केली. मात्र तरीही आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.
आगारांच्या भेटी… कृती समितीमध्ये उद्धव ठाकरे यांची बेस्ट कामगार सेना आहे आणि खासदार नारायण राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना देखील समाविष्ट आहे. गेल्याच आठवड्यात बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी कामगार नेत्यांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवली. सोमवारी कृती समितीचे नेते मरोळ, मजास, दिंडोशी आणि मागाठणे आगारामध्ये जाऊन द्वार सभा घेऊन कामगारांना आंदोलनाची कल्पना दिली जाणार असल्याची माहिती समर्थ बेस्ट कामगार सेनेचे विलास पवार यांनी दिली.
