नव्या डय़ुटी शेडय़ुलविरोधात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी केलेला विरोध उत्स्फूर्त असून त्यात आमच्या कर्मचारी संघटनेचा काहीच सहभाग नाही, असे मंगळवारी रात्री सांगणाऱ्या शरद राव यांनी बुधवारी मात्र हा संप मिटवण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यापासून स्वत: पत्रकार परिषद आयोजित करण्यापर्यंत सर्व गोष्टींत हिरीरीने भाग घेतला. राव यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे या संपामागे राव यांचीच फूस होती का, अशी चर्चा आहे.
राव यांनी मंगळवारी प्रशासनाशी चर्चा करण्याचेही टाळले. तरी मंगळवारी रात्रीही सर्वच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी एकत्रितपणे चर्चा करूनच पुढील आराखडा ठरवत होते. याच चर्चेदरम्यान मंगळवारचा संप बुधवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र मंगळवारी रात्री राव यांना याबाबत विचारले असता, आपल्या मते बुधवारीही कर्मचारी कामावर जाणार नाहीत अशी हवा आहे, असे सांगत या संपातील त्यांची भूमिका संदिग्ध केली़  बुधवारी दुपारी मात्र राव प्रशासनासह चर्चेला तयार झाले. एवढेच नाही, तर त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसमोरही प्रशासनासह चर्चा केली. मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राव यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले असता, या प्रश्नांचे उत्तर द्यायचे टाळून राव परिषदेतून निघून गेले.