scorecardresearch

बेस्टचा प्रवास स्वस्ताईकडे!

बेस्टने गेल्या वर्षी आíथकदृष्टय़ा सावरण्यासाठी दोनदा भाडेवाढ केली

भाडेसूत्रात एक रुपयाने बदल अपेक्षित; वातानुकुलित गाडय़ांचे तिकीटदरही कमी होणार

गेल्या काही वर्षांपासून खालावणारे प्रवासी उत्पन्न आणि ४० लाखांवरून २८ लाख एवढी घसरलेली प्रवासी संख्या यांमुळे आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी आता भाडेसूत्रात बदल होण्याचा विचार आहे. त्यानुसार बेस्टचे सध्याचे किमान तिकीट भाडे एका रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे. तिकीट भाडे कमी झाल्यास शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळलेले प्रवासी बेस्टकडे आकृष्ट होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. विशेष म्हणजे या बदललेल्या भाडेसूत्रानुसार वातानुकुलित गाडय़ांचे तिकीट दरही कमी होतील.

बेस्टने गेल्या वर्षी आíथकदृष्टय़ा सावरण्यासाठी दोनदा भाडेवाढ केली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत किमान पाच रुपये असलेले बेस्टचे तिकीट सध्या किमान आठ रुपये एवढे आहे. मात्र बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ३५ ते ३८ लाख एवढी असलेली बेस्टची प्रवासी संख्या सध्या २८ लाख एवढी खाली आली आहे. त्यामुळे तिकीट दर वाढवूनही काहीच फायदा झालेला नाही. आता घडल्या प्रकारातून शहाणपण घेत बेस्टने आपल्या भाडेसूत्रात बदल करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रशासन बेस्ट समिती सदस्य आणि प्रवासी यांच्या सूचना विचारात घेऊनच हा बदल करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुनर्रचनेबाबतचा अंतिम प्रस्ताव पुढील दोन आठवडय़ांत समितीसमोर मांडण्यात येणार आहे. पण आताच किमान तिकीट किती रुपयांनी कमी होईल, हे सांगणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिकीट दरवाढ प्रस्तावित असताना त्या वेळी बेस्ट समितीतील मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी सातत्याने या वाढीला विरोध केला होता. बेस्टने महसूल वाढवण्यासाठी अन्य साधनांवर भर द्यायला हवा, अशी भूमिका होंबाळकर यांनी मांडली होती.

नक्की काय होणार?

  • दुरावलेल्या प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी पॉइंट टू पॉइंट सेवा, तिकीट दरांची पुनर्रचना आणि किलोमीटर टप्प्यात बदल या सुधारणा बेस्ट आता करणार आहे.
  • सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावानुसार वातानुकुलित गाडय़ांच्या दरांतही बदल होणार आहे. तसेच बेस्टचे किमान बसभाडे एका रुपयाने कमी होण्याचीही शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best bus ticket price decrease