मुंबई : दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्विनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी वाहकाचा सोमवारी रात्री शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मृत्यू झाला.

दादर टीटी खोदादाद सर्कल येथे २७ ऑक्टोबरला तेजस्विनी बसच्या चालकाने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून भरधाव वेगात येऊन धडक दिली होती. या दुर्घटनेत १० जखमी झाले होते, त्यापैकी गंभीर जखमी चालक राजेंद्र सुदाम काळे यांचा शुक्रवारी सकाळी सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वाहक काशिराम धुरी (५७) यांचा सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात सुलतान अन्सारी (५०), रुपाली गायकवाड (३६) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.