ऐन उन्हाळ्यातच ‘बेस्ट’च्या ६६ टक्के वातानुकूलित बस गाडय़ा बंद

सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८५ वातानुकूलित बसपकी अवघ्या १२४ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील २७० वातानुकुलित बसगाडय़ांतून दर दिवशी फक्त पाच लाख रुपयांचा महसूल मिळत असल्याचे आढळले आहे.

वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडाने हैराण झालेल्या मुंबईकरांनी ‘बेस्ट’च्या वातानुकूलित गाडय़ांकडे पाठ फिरवल्याने सुमारे ६६ टक्के बस गाडय़ा आगारात बंद अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गारेगार सेवा देण्याचा बेस्टचा हा प्रयत्न उपक्रमासाठी मात्र भलताच गरम ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८५ वातानुकूलित बसपकी अवघ्या १२४ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. हे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे समोर आले आहे. तसेच २०१३ साली बेस्टच्या ताफ्यात २९० बस गाडय़ा होत्या. तेव्हाही त्यापकी केवळ १६१ बस गाडय़ा रस्त्यावर धावत होत्या. २०१४ला २९० पकी १४७ बस गाडय़ा रस्त्यावर धावत होत्या, तर २०१५ साली हाच आकडा अध्र्याहून कमी म्हणजे १२४ वर पोहोचला असून केवळ ४४ टक्के वातानुकूलित बस गाडय़ा रस्त्यांवर धावत असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. थोडक्यात अधिकचे भाडे आकारून प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाची हमी देणाऱ्या या गाडय़ांची सेवा पूर्ण क्षमतेने कधी वापरलीच गेली नाही. मग या गाडय़ांमध्ये गुंतवणूक करून उपयोग काय, असा प्रश्न आहे.
प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बेस्ट प्रशासनावर वातानुकूलित बस गाडय़ा बंद करण्याची वेळ ओढवली असल्याची ओरड नेहमीच केली जाते. मात्र केवळ हेच एक कारण नसून इतर विविध कारणांमुळे अनेक वातानुकूलित गाडय़ा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवते आहे. काही मोठय़ा कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली बस सेवा आणि कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या वातानुकूलित टॅक्सी यांमुळे बेस्टच्या सेवेवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, प्रवाशांची कमी होणारी संख्या आणि तांत्रिक बिघाड यावर अभ्यास सुरू आहे. भाडय़ात सवलत देणे, वाय-फाय सेवा पुरविणे आदी उपाय योजून प्रवासी संख्या वाढविता येईल का, याची चाचपणी बेस्ट प्रसासन करीत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Best closed 66 percent air conditioned bus

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या