मुंबई : स्टच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील चालकांना प्रशिक्षण दिल्यानंतरही अपघाताची मालिका काही थांबलेली नाही. आोशिवरा आगारातील पीएमआय कंपनीच्या कंत्राटी बसने सोमवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अंधेरीच्या गोखले पुलावर तब्बल सहा वाहनांना धडक दिली. त्यात एक रिक्षा चालक, एक पादचारी आणि एक दुचाकी चालक जखमी झाले. चालकाने हँण्डब्रेक सोडल्याने बस पुढे उभ्या असलेल्या वाहनांना धडकली.
उपक्रमाने काटकसरीचा भाग म्हणून भाडेतत्वावरील बसला प्राधान्य दिले. मात्र आता हेच प्राधान्य मुंबईकरांच्या जीवावर उठले आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या भाडेतत्वावरील बसचे अपघात वाढले आहेत. सोमवारी दुपारी १२ वाजता ओशिवरा आगाराची बसमार्ग क्रमांक ए २२१ बस अंधेरी बस स्थानक (पश्चिम) ते वर्सोवा बस स्थानकाकडे जात होती. गोखले पुलावर बस आली असता, चालकाने हँण्डब्रेक सोडला.
हँण्डब्रेक सोडताच, बस अचानक पुढे सरकली आणि बसच्या पुढे थांबलेल्या चार रिक्शा, एक एर्टिगा चालचाकी आणि एका ॲक्टिव्हा स्कूटरला धडकली. या अपघातात एक रिक्शा चालक, एक पादचारी आणि ॲक्टिव्हा स्कूटरस्वार जखमी झाले. बस वाहकाने तात्काळ १०० नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने, वाहकाने जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. अंधेरी पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार, पुढील कायदेशीर आणि पोलीस औपचारिकतांसाठी बस कुमकुम चौकी येथे थांबवण्यात आली आहे.
बसवरील चालक कंत्राटी आहे. तर वाहक बेस्टचा आहे. या अपघातात रिक्शा चालक (५१ ) एनस शेख यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. पादचारी मनोजकुमार बाजदेव (३०) यांच्या मानेला तर ॲक्टिव्हा चालक अनिस निसार धारी (२०) याच्या कमरेच्या उजव्या बाजूला जबर दुखापत झाली आहे. भाडेतत्वावरील बसच्या वाढत्या अपघातामुळे बेस्टच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कंत्राटी बसला प्रवाशांचा विरोध वाढत आहे.
अपघातातील वाहनांचे नुकसान-
१ ऑटोरिक्षा MH02EQ4812
२ ऑटोरिक्षा MH02FB6449
३ ऑटोरिक्षा MH02EW9599
४ ऑटोरिक्षा MH02GL2635
५ एर्टिगा कार MH46DC6428
६ ॲक्टिव्हा स्कूटी MH47BM5089
