मुंबई : वेतन आणि भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी बेस्ट उपक्रमाच्या पाच आगारांतील भाडेतत्त्वावरील बसवरील कंत्राटी चालकांनी चौथ्या दिवशीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे ११५ बस प्रवाशांच्या सेवेत येऊ शकल्या नाही. चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही उपक्रमाकडून आंदोलनाला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर केवळ दंडात्मक कारवाईचे आश्वासन दिले जात आहे. मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कंत्राटी चालक, प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांचा समावेश आहे. भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीनेच कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती केली आहे. कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, वडाळा, कुलाबा या पाच आगारांमध्ये एमपी ग्रुपचे कंत्राटी चालक असून त्यांना १८ हजार रुपये वेतन मिळते. तर भविष्य निर्वाह निधीची रक्कमही खात्यात जमा होते, परंतु वेतन वेळेवर मिळत नसून भविष्य निर्वाह निधीची रक्कमही खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे १७ मेपासून या पाच आगारांतील काही कंत्राटी चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले. तेव्हापासून प्रत्येक आगारातील काही बस प्रवाशांच्या सेवेत येऊ शकलेल्या नाहीत. शुक्रवारीही पाच आगारांतील २७५ पैकी ११५ बस प्रवाशांच्या सेवेत न आल्याने काही मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांना बसची बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रत्येकी न चालवलेल्या बसमागे पाच हजार रुपये दंड कंत्राटदारावर आकारण्यात येत असल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु गेल्या चार दिवसांत ठोस कारवाई होत नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन व अन्य मुद्दय़ांवरही तोडगा निघू शकलेला नाही. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.