मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या धारावी आणि काळाकिल्ला आगारांची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पात जात आहे. ही जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (डीआरपी/एसआरए) आणि मे. नवभारत मेघा डेव्हलपर्स प्रा. लि. (एनएमडीपीएल) यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे.
आगारांच्या जमिनीचे हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली. जमिनीच्या बदल्यात बेस्टला दोन नवीन सुसज्ज आगार बांधून देण्यात येणार आहेत. बेस्टच्या अंदाजित ११.५८ एकर भूखंडावर धारावी आणि काळाकिल्ला आगार आहेत. या दोन्ही आगारांची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पात जाणार आहे. या दोन आगारांतील बस सेवा सुरू राहण्यासाठी ‘एनएमडीपीएल’ विद्यमान भूखंडावर तात्पुरते (मेक शिफ्ट) आगार उभारणार आहे. तसेच, विद्यमान आगारांऐवजी ‘एनएमडीपीएल’ उपक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणी दोन नवीन आगार उभारून देणार आहे. या आगारांमध्ये एकूण ४७० बसगाड्या उभ्या करण्याची क्षमता असून आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
सध्या अस्तिवात असलेल्या धारावी व काळाकिल्ला आगारांच्या एकूण ११.५८ एकर भूखंडापैकी ६.१७ एकर भूखंडावर तात्पुरत्या बस आगाराचे बांधकाम होणार आहे. तात्पुरत्या बस आगारात एकूण १४५ बस उभ्या करता येतील. तात्पुरत्या आगाराचे बांधकाम झाल्यानंतर उर्वरित ५.४१ एकरचा भूखंड डीआरपी/ एसआरए आणि एनएमडीपीएल यांना हस्तांतरित करण्यात येईल.
४५० बसेसना जागा
धारावी तसेच काळाकिल्ला आगारात ४०० ते ४५० बसेस उभ्या राहू शकतील. भूखंडावर आगार व वाणिज्य इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. नवीन आगारांच्या इमारतींमध्ये खालच्या मजल्यावर गाड्या उभ्या करण्यात येतील. तसेच तळमजला व इतर वरील मजल्यांवर आगार व त्यासाठी लागणार्या सोयी- सुविधांचा समावेश असणार आहे. आगारांची देखभाल-दुरुस्ती ५ वर्षांसाठी मेसर्स नवभारत मेघा डेव्हलपर्स प्रा.लि. (एनएमडीपीएल) करणार आहे.
