मुंबई : मुंबईतील रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस ही अपंग प्रवाशांसाठी निरुपयोगी ठरली आहे. बेस्टच्या ताफ्यात अपंगस्नेही बसगाड्या समाविष्ट आहेत. परंतु, प्रत्यक्षात या बसचा वापर अपंग प्रवाशांना करता येत नाही. परिणामी, अपंग प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीसाठी अधिकचे पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.

नुकताच जागतिक अपंग दिन पार पडला. सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना देणे या संकल्पनेवर हा दिवस आधारित होता. परंतु, मुंबईतील वाहतूक सेवा अपंग प्रवाशांच्या बाबतीत प्रतिकूल आहे. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या २४९ आणि खासगी २,४९२ अशा एकूण २,७४१ बसगाड्या आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील टाटाच्या खासगी ३४० बसमध्ये व्हीलचेअर बस लिफ्ट सेवा आहे. तर, नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये व्हीलचेअर बस लिफ्ट सेवा नाही. तर, यात अपंग आणि ज्येष्ठ प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी बस डाव्या बाजूला झुकण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रस्ता आणि बसमधील उंची कमी होते. परंतु, या सुविधा असूनगी अपंग प्रवाशांसाठी या बसगाड्या निरुपयोगी ठरत आहेत.

अपंग प्रवासी नीतू मेहता हिला बेस्टच्या गलथान कारभाराचा सामना करावा लागला. नीतू ही पॅरा नॅशनल फेन्सर्स, व्हील चेअर डान्सर, महिला व्हीलचेअर क्रिकेटर आहे. परंतु, मुंबईत प्रवास करताना तिला अनेक समस्या भेडसावल्या. अपंगस्नेही बेस्ट बसमधून तिला प्रवास करता आला नाही, असे तिने सांगितले.

ग्रॅन्ट रोड येथून कस्तुरबा गांधी चौक येथे जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी बसची वाट पाहत थांबली. बसमध्ये रॅम्पची सेवा असून देखील बस थांबत नव्हत्या. तीन बसनंतर एक बस थांबली. परंतु, बस चालकाला व्हील चेअर बस लिफ्ट कसे खुले करायचे याची माहिती नसल्याने ती बसही निघून गेली. मुंबईत अपंग प्रवाशांना प्रवास करणे खूप कठीण झाले आहे. एखाद्या जवळच्या ठिकाणी जायचे असले तरी दोन तास आधीच घरातून निघावे लागते. सर्वसामान्य प्रवाशांना रिक्षा-टॅक्सी मिळणे अवघड असते. तर, आम्हाला या सेवेचा लाभ क्वचितच मिळतो. त्यासाठीही जादा पैसे मोजावे लागतात. – नीतू मेहता, अपंग प्रवासी

बेस्टच्या अपंगस्नेही बस अद्याप मुंबई उपनगरात दिसलेल्या नाहीत. अपंग प्रवाशाला बसमध्ये शिरणे कठीण होते. व्हीलचेअरने प्रवास करणारे प्रवासी बस प्रवासापासून वंचित आहेत. बेस्ट प्रशासनाने याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. – विकास हळदणकर, अध्यक्ष, अपंग मैत्री

मुंबईतील प्रत्येक बेस्ट बस मार्गावरील बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. बस प्रवाशांनी भरगच्च भरलेली असते. त्यामुळे बसमधील व्हीलचेअर लिफ्ट सेवेचा वापर अपंग प्रवाशांसाठी करता येत नाही. तसेच, व्हीलचेअर लिफ्ट खुली करण्यास, त्यात प्रवासी बसण्यास आणि पुन्हा लिफ्ट बंद करण्यास अधिक वेळ खर्च होतो. चालकांना व्हीलचेअर लिफ्टबाबतचे प्रशिक्षण दिले जाते, असे बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्याने सांगितले.