बेस्ट उपक्रमाकडून विजेवर चालवण्यात येणारी दुमजली वातानुकूलित बस अद्यापही मुंबईकरांच्या सेवेत आलेली नाही. दुमजली बस चालवण्यासाठी सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबरची मुदत निश्चित केल्यानंतरही प्रवाशांना या बसची अद्याप प्रतीक्षाच आहे. प्रवाशांच्या सेवेत येण्यापूर्वी ही बस चाचण्यांमध्येच अडकली आहे. वातानुकुलीत बस सेवा कधी सुरू होईल, हे बेस्ट प्रशासनाकडूनही अद्याप निश्चित सांगण्यात आलेले नाही.सध्या बेस्ट उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. दुमजली बसची प्रवासी आसन क्षमता ७८ आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्याने प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बस भाडेतत्त्वावर ताफ्यात येतील. यातील पहिल्या दुमजली बसला ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई: विलेपार्लेत स्टुडिओ घोटाळ्यात पालिकेची वरवरची कारवाई; उपायुक्तांना खोटा अहवाल सादर

त्यानंतर पुण्यात एआरएआय (ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) येथे बसच्या चाचणीला सुरुवात झाली. एका बसची चाचणी झाल्यानंतर आणखी दोन ते तीन बसच्या चाचण्या केल्या जात असून त्याही पूर्ण झाल्या आहेत. मात्र यातील एकही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली नाही. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सध्या याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>मुंबईः बिअर विक्री परवान्यासाठी राज्यपालाच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र

दुमजली वातानुकुलीत बसची वैशिष्ट्ये
बसमध्ये आसनक्षमता ६६ असून उभ्याने दहा प्रवासी प्रवास करु शकतात.

सीसीटीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था

दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे आहे

८० मिनिटांत बसचे चार्जिंग होते.

प्रीमियम बसही सेवेत नाहीत

बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲपआधारित टॅक्सीप्रमाणे प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना या बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे. मोबाइल ॲपद्वारे प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस असतील याची माहिती मिळू शकेल. त्यानुसार नियोजन करून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येईल आणि तिकीटाचे पैसे ऑनलाईन भरता येतील. सुमारे २०० प्रीमियम बस टप्प्याटप्याने ताफ्यात दाखल होणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले होते. या बससाठीही ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. ही सेवाही सुरू होऊ शकलेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best double decker air conditioned buses have not come into service mumbai print news amy
First published on: 23-11-2022 at 17:06 IST