मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील भाडेत्तवावरील विद्युत बसचे वाढते अपघात लक्षात घेऊन उपक्रमाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्युत बसच्या चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी चालकांना केवळ एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

तोटा कमी करून आर्थिक बचत करण्यासाठी बेस्टने गेल्या काही वर्षांपासून काटकसरीचा मार्ग स्वीकारला आहे. बेस्टने खर्च कमी करण्यासाठी भाडेत्तवावरील बस ताफ्यात सामाविष्ट केल्या. मात्र आता या भाडेत्तवावरील बसचा प्रवास काहीसा असुरक्षित झाला आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या दोन हजार ७९२ बस आहेत. यापैकी केवळ २४९ बस स्वमालकीच्या असून दोन हजार ५५४ बस भाडेत्तवावरील आहेत. भाडेत्तवावरील बसपैकी एक हजार २२५ सीएनजी, तर एक हजार ३१९ बस विद्युत आहेत.

अलिकडेच विद्युत बसना आग लागण्याच्या आणि अपघातांच्या काही घटना घडल्यामुळे बेस्ट प्रशासनाने सुरक्षे उपाय अधिक कडक केले आहेत. विविध तपासण्यांदरम्यान सुमारे १० ते ११ बसमध्ये तांत्रिक दोष आढळून आला होता. त्यामुळे संबंधित बस तत्काळ सेवेतून बाजूला काढण्यात आल्या होत्या.

बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन प्रशिक्षणामध्ये तांत्रिक बाबींची माहिती, सुरक्षित वाहनचालक पद्धती, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि शिस्तबद्ध संचालन यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच बसची देखभाल व तपासणी प्रक्रियाही अधिक कठोर करण्यात आली आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि चालकांना ई-बसच्या कार्यपद्धतीची सवय होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

निष्काळजी चालकांवर कारवाई

कुर्ला, प्रतीक्षा नगर आणि सांताक्रूझ आगार येथे मे महिन्यात बसना आग लागल्याच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. याशिवाय काही आगारांतील देखभाल व्यवस्थेतील त्रुटी, गॅरेजमधील घटना आणि चालकांच्या वर्तनाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. बेस्ट समिती सदस्यांनी बसच्या देखभालीवर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याची, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. नव्या प्रशिक्षणामुळे बस सेवा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. भांडुप आणि कुर्ला येथे बस मागे जाण्याच्या घटनांनंतर हे प्रशिक्षण अधिक कठोर करण्यात आले आहे. या दोन्ही अपघातात विद्युत बसचा समावेश होता.

प्रशिक्षणात काय ?

उतार किंवा अरुंद रस्त्यांवर बस कशी हाताळावी, तसेच हँडब्रेकचा योग्य वापर यावर भर दिला जातो. विद्युत बसमधील प्रगत ब्रेकिंग सिस्टीम समजून घेणे. डिझेल बसवरून विद्युत बसवर शिफ्ट होत असताना सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे.