scorecardresearch

मुंबईच्या रस्त्यांवर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस; आदित्य ठाकरेंची घोषणा

बेस्ट मुंबईसाठी ९०० वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्यात येणार आहे

best Electric double decker bus for Mumbai says aditya Thackeray
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र सरकार प्रतिष्ठेच्या डबलडेकर बेस्ट बसेस पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्याची तयारी सुरू आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) मुंबईसाठी ९०० इलेक्ट्रिक डबल-डेकर बस खरेदी करत असल्याची माहिती दिली आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील प्रतिष्ठित डबलडेकर बसचे पुनरुज्जीवन करण्यास वैयक्तिकरित्या उत्सुक आहेत, असेही आदित्य ठाकरेंने म्हटले आहे.

“सर्वोत्तम डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी वैयक्तिकरित्या मुंबईच्या प्रतिष्ठित डबल डेकर बसेसचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक आहोत,” असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे. आम्ही अधिकाधिक डबल डेकर बस आणणार आहोत, यामुळे आमची क्षमता वाढेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

बेस्ट मुंबईसाठी ९०० वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्यात येणार आहे. “आम्ही बेस्टच्या ताफ्यात १०,००० इलेक्ट्रिक/क्लीन पर्यायी इंधन बस वाढवत असताना, बहुतांशी डबल-डेकर बसेस समाविष्ट करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) हा महानगरपालिकेचा भाग आहे. याआधी मंगळवारी, बेस्ट समितीने १२ वर्षांच्या कालावधीसाठी मुंबईसाठी ९०० एसी इलेक्ट्रिक डबल-डेकर बस भाडेतत्त्वावर खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, या प्रकल्पासाठी ३,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र क्लीन एअर प्रकल्पांतर्गत बेस्टला यापूर्वीच ९९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे सुरुवातीला डबल डेकरच्या खरेदीसाठी वापरले जातील. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, “या वर्षी २२५ डबल डेकरची पहिली तुकडी येणे अपेक्षित आहे. २२५ बसची पुढील तुकडी मार्च २०२३ पर्यंत आणि उर्वरित ४५० बस जून २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.

सध्या मुंबईत ४८ नियमित डबल डेकर बसेस आहेत. पर्यावरणपूरक असणार्‍या ९०० नवीन एसी डबल डेकरच्या खरेदीमुळे या प्रतिष्ठित बस एक दशकाहून अधिक काळ रस्त्यावर राहणार आहेत याची खात्री असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यामुळे केवळ ताफ्यातच भर पडणार नाही, तर बेस्टची प्रवासी वाहतुकीची क्षमताही वाढेल आणि गर्दीच्या वेळेत ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी कमी होणार आहे.

इतर शहरांमध्येही डबल डेकर बस धावणार

मुंबई व्यतिरिक्त, आम्ही इतर शहरांच्या महापालिका आयुक्तांना ते खरेदी करत असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरील बसची क्षमता वाढणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2022 at 23:28 IST