मुंबई : मुंबई शहरात अनेक ठिकाणी पुर्नविकासाचे प्रकल्प सुरु आहेत. मोठमोठ्या इमारती-गृह संकुले उभी राहत आहेत.या इमारती-गृह संकुलांना खासगी वीज पुरवठादार वीज जोडणी देत आहेत.त्यामुळे बेस्टची खासगी वीज पुरवठादारांशी स्पर्धा सुरु झालेली आहे. या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने वीज ग्राहक वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गणेशोत्सवादरम्यान एक संपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे. उपक्रमाने शहरातील गणेश मंडळे, गृहनिर्माण सोसायट्या, नव्याने बांधलेल्या इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांना भेट देण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. बेस्टच्या सध्याच्या सुमारे १०.६० लाख वीज ग्राहकसंख्येमध्ये एक लाखांहून अधिक ग्राहक जोडणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
शहरातील महापालिका प्रभागांचा समावेश असलेल्या पथकांची उत्तर आणि दक्षिण विभागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ही पथके ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी नवीन वीज जोडण्यांवर विशेष काम करणार आहे. बेस्टला वीज पुरवठ्यासाठी आवश्यक सबस्टेशन उभारण्यात येणाऱ्या अडचणींमुळे टाटा पॉवरने वडाळ्यातील मोठ्या गृहसंकुलाला वीज पुरवठा केला. दरम्यान, टाटा पॉवरचा ग्राहकवर्ग ८ लाखांवर पोहोचला असून, गेल्या काही वर्षांत त्यात एक लाखांहून अधिक वाढ झाली आहे. मर्यादित जागा असलेल्या ठिकाणीही नवीन ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनी नवनवीन कल्पनांचा वापर करत आहे. टाटा पॉवर कंपनीने परळमध्ये आपले पहिले भूमिगत सबमर्सिबल सबस्टेशन विकसित करून कार्यान्वित केले आहे. ४०० केव्हीए क्षमतेचे उपकेंद्र पावसाळ्यात, पाण्याखाली पूर्णपणे बुडालेले असतानाही कार्यरत राहिले आहे.
टाटा पॉवरची अधिक उपकेंद्रांची योजना टाटा पॉवरने पुढील चार वर्षांत मुंबईत १०० हून अधिक भूमिगत उपकेंद्रे उभारण्याची योजना आखली आहे. यामुळे दाट लोकवस्तीच्या निवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये व्होल्टेजची स्थिरता सुधारण्यास मदत होईल.
बेस्टसाठी, ही मोहीम केवळ ग्राहक मिळविण्यासाठी नाही. नवीन इमारती आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे वीज जोडणीची नवीन मागणी निर्माण होत असलेल्या बाजारपेठेत आपले स्थान पुन्हा मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. बेस्ट ही एक जुनी आणि विश्वासार्ह संस्था आहे.-तृष्णा विश्वासराव, अध्यक्षा, बेस्ट समिती
