दिवाळी दोन दिवसांवर आली तरीही बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची चिन्हे दिसत नसून बेस्ट प्रशासन आणि बेस्ट समिती या संदर्भात वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करीत गुरुवारी बेस्ट कामगार संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बोनस नाकारल्यास बेस्ट कर्मचारी ऐन दिवाळीमध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे.
आर्थिक डोलारा डळमळीत झाल्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला नव्हता. यंदाही बोनस मिळण्याची चिन्हे धुसर बनली आहेत. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा या मागणीसाठी २५ ऑक्टोबर रोजी वडाळा आगारासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र बेस्ट प्रशासन आणि बेस्ट समितीने या संदर्भात अद्यापही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे बेस्ट कामगार संघर्ष समितीने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता परळ येथील डॉ. शिरोडकर हॉलमध्ये बेस्ट कामगारांची सभा आयोजित केली आहे. बोनस नाकारण्यात आला तर कशा पद्धतीने आंदोलन करायचे याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येईल, असे कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले.