पाच हजार रुपये दिवाळीभेट; रक्कम बेस्टला फेडावी लागणार
आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे गेली तीन वर्षे बोनसपासून वंचित राहिलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदात जाणार आहे. सत्ताधारी शिवसेनेने पुढाकार घेत ‘मातोश्री’मध्ये झालेल्या बैठकीत बेस्ट प्रशासनाचे मन वळवून कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी राजी करण्यात आले आहे. त्याचबरोबर पालिका आयुक्तांनी कर्जाचा व्याजासह हप्ता तूर्तास न भरण्याची मुभा दिल्यामुळे यंदा बेस्टमधील कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे. मात्र ही रक्कम नंतर बेस्टला फेडावी लागणार आहे. वाढता खर्च आणि महसुलात झालेली घट यामुळे बेस्टचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही.

शिवसेनेची मध्यस्थी..
बोनस प्रश्न चिघळू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली. ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत प्रशासनासोबत वाटाघाटी करण्यात आल्या. या बैठकीस बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दुधवडकर, महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्यासमवेत कामगार संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना यंदा किमान पाच हजार रुपये बोनस द्यावा, अशी सूचना ठाकरे यांनी केली.