बेस्ट कर्मचाऱ्यांचा १५ फेब्रुवारीपासून बेमुदत बंदचा इशारा

बसगाड्या भाड्याने घेण्यास मंजूरी दिल्याने असंतोष

संग्रहित छायाचित्र

प्रवासी संख्या कायम राखण्यासाठी तसेच आर्थिक तोटा कमी करण्यासाठी बेस्ट समितीने २०० वातानुकुलीत मिनीबस, २०० साध्या मिनीबस आणि २५ मिडीबस ७ वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यासाठी टेंडरलाही सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून त्यांनी १५ फेब्रुवारीपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

आर्थिक तोटा कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने काही महत्वपुर्ण उपाययोजना आखल्या असून त्यासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तिकिट दरवाढीचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असल्याने नव्या बस विकत घेण्याऐवजी समितीने २०० वातानुकुलीत मिनीबस, २०० साध्या मिनीबस आणि २५ मिडीबस ७ वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार दोन टप्यांत बसेस घेण्यात येणार आहेत. मात्र, खासगी भाडेतत्वावरील बसेसला मंजुरी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून कामबंद आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गुरुवारी बेस्टची शहरातील वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेस्ट प्रशासनाकडे असलेल्या जुन्या बसेस आयुर्मान संपल्यामुळे भंगारात काढण्यात येत आहेत. या बसेसच्या जागी नव्या बसेस खरेदी करणे बेस्ट प्रशासनाला आर्थिक दृष्ट्या शक्य नाही, त्यामुळे भाडेतत्वावर बसेस घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या होत्या. या कंपन्यांना कंत्राट दिल्यानंतर उपक्रमाच्या आवश्यकतेनुसार ३ महिन्यांमध्ये २५ टक्के, चौथ्या महिन्यामध्ये ५० टक्के आणि उरलेल्या २५ टक्के बसगाड्या पाचव्या महिन्यामध्ये पुरविण्याचे या कंपन्यानी मान्य केल्याचे बेस्टने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.

बेस्टची प्रवासी संख्या ३० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे हीच प्रवासी संख्या कायम राखण्यासाठी किंबहुना वाढविण्यासाठी बसेसचा आवश्यक ताफा असणे आवश्यक असल्याचे बेस्टने प्रस्तावात नमूद केले आहे. परंतू सध्याची बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असल्याने नविन बसेस विकत घेणे शक्य नसल्यामुळे भाडेतत्वावरच बसेस घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रस्तावाला कँग्रेस आणि भाजपा सदस्यांनी विरोध केल्यानंतरही सोमवारी बेस्ट समितीने बसेस भाड्याने घेण्यासाठी मंजुरी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Best employees caveat for strike from 15 february