९५ टक्के कर्मचारी ‘बंद’ करण्याच्या बाजूने

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक तोटय़ात सापडल्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून बेस्टला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करता आले नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात आहेत. संप करायचा की नाही यासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी बुधवारी पार पाडली. या मतमोजणीत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला आहे.

मुंबईतील सर्व आगारांतील १९ हजार ९४ बेस्ट कर्मचाऱ्यांपैकी १८ हजार ५३७ कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. ४९६ कर्मचाऱ्यांनी संपास विरोध केला असून ६१ मतपत्रिका विविध कारणांनी बाद ठरवण्यात आल्या. बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शवल्याने ‘बेस्ट’चा संप अटळ असल्याचे बोलले जात आहे.

येत्या दोन दिवसांत कृती समितीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यातच संपाची पुढील भूमिका ठरवण्यात येणार आहे. इतक्या मोठया संख्येने कर्मचाऱ्यांनी मतदान करून संपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने आमची परीक्षा बघू नये, अशी प्रतिक्रिया बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.मुंबई बेस्ट सेवेचे चाक सध्या आर्थिक अडचणीच्या चिखलात रुतले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याइतपतही उपक्रमाची पत उरलेली नाही.

पगारापोटी दरमहा होणारा ८० कोटींचा खर्चही बेस्ट प्रशासनाला झेपेनासा झाला आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनावर दबाव वाढवण्यासाठी ‘बेस्ट’मधील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन ‘बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती’ स्थापन केली आहे.

बेस्टचे कर्मचारी हे मुंबई महापालिकेचे कर्मचारी असून त्यांचे पगार देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी. कराराप्रमाणे वेळेवर पगार द्यावेत.

‘कॅनडा डय़ूटी शेडय़ूल’ रद्द करावे. प्रलंबित वेतन करार मार्गी लावावेत, अशा मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी संप करावा की नाही, यासाठी संघटनांनी मंगळवारी बेस्ट कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले.

पास सवलतीही बंद?

सध्या बेस्टचा तोटा २ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दर महिन्याला त्यात १०० कोटी रुपयांची भर पडते. बेस्टने तोटा कमी करण्यासाठी तोटय़ातील एसी बसेस बंद केल्या. आता अधिकाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते, विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या पास सवलतीही बंद करण्याचा विचार सुरू आहे. मुंबई महापालिका आणि बेस्टचे बजेट एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best employees strike
First published on: 20-07-2017 at 03:48 IST