मुंबई: मुंबईची जीववाहिनी असलेल्या बेस्टच्या बसभाड्यात उद्या शुक्रवारपासून वाढ होणार आहे. बेस्टच्या बहुचर्चित भाडेवाढीला अखेर परिवहन प्राधिकरणाने लेखी मंजूरी दिली असून बेस्ट उपक्रमाने सुचवल्यानुसारच ही भाडेवाढ होणार आहे. मुंबईकरांना शुक्रवारपासूनच बेस्ट बसच्या प्रवासासाठी दुप्पट भाडे द्यावे लागणार आहे. साध्या बससाठी किमान भाडे १० रुपये दर वातानुकूलित बससाठी किमान भाडे १२ रुपये द्यावे लागणार आहे. पाच ते सहा रुपयात बेस्टचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुक्रवारपासून बसभाड्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

बेस्ट उपक्रमाने बसभाडेवाढीबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मंजूरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. या प्राधिकरणाची लेखी मंजूरी बेस्ट उपक्रमाला मिळाली असून शुक्रवारपासून बेस्टची भाडेवाढ होणार आहे. त्याकरीता बेस्ट उपक्रमाने पूर्ण तयारी केली आहे.

सर्व आगारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांचे सध्याचे भाडे अतिशय कमी आहे. त्यामुळे प्रवाशांचा, मुंबईकरांचा या बेस्ट बसला पसंती असते. मात्र शुक्रवारपासून बसभाड्यात दुप्पट वाढ होणार आहे. विद्यमान भाडेसारणी मध्ये ५,१०,१५, व २० कि.मी. अंतरावर भाडेटप्पा देण्यात आले होते. तथापि प्रस्तावित भाडेतक्त्यामध्ये ५,१०,१५,२०,२५,३०,३५,४०,४५,व ५० कि.मी. व त्यानंतर प्रत्येक ५ कि.मी. अंतरावर भाडेटप्पा देण्यात आलेले आहेत.

बारा वर्षांपर्यंतच्या बालकांना सवलतीचे भाडेबेस्टने किमान भाडयात दुपटीने वाढ केली आहे. साधारण बसचे किमान भाडे पाच रुपये आहे ते १० रुपये प्रस्तावित केले आहे. तर वातानुकुलित बसचे किमान भाडे सहा रुपये आहे ते बारा रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. सध्याच्या प्रवासभाडयात १२ वर्षे वयापर्यतच्या मुलांना सवलतीच्या प्रवासभाड्याची तरतूद उपलब्ध नाही, परंतु नवीन सुसूत्रीकरणादरम्यान ५ ते १५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्रवासभाडयात सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. बालकांचा तिकिटाचा दर हा किमान पाच रुपये असणार आहे.

सध्या बेस्टला वार्षिक ८४५ कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढीमुळे वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी असेल भाडेवाढ (साधारण बससाठी )

अंतर (किमी) सध्याचे भाडेप्रस्तावित भाडे
५ रुपये१० रुपये
१०१० रुपये१५ रुपये
१५१५ रुपये२० रुपये
२०२० रुपये३० रुपये

वातानुकूलित बस

अंतर (किमी) सध्याचे भाडेप्रस्तावित भाडे
६ रुपये१२ रुपये
१०१३ रुपये२० रुपये
१५१९ रुपये३० रुपये
२०२५ रुपये३५ रुपये

दैनंदिन बसपासही वाढला

बेस्टच्या दैनंदिन व मासिक बसपासलाही प्रवाशांची पसंती असते. या बसपासच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. दैनंदिन बसपासचे शुल्क ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. मासिक बसपासचे शुल्क ९०० रुपयांवरून १८०० रुपये करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांकरीता बसपासमध्ये कोणताही बदल नाही

उपक्रमाच्या बससेवांवर खाजगी शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ यामधून शिक्षण घेणा-या वयोमर्यादा २६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना विद्यमान सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करुन देण्यात येतो. या बसपासच्या मुल्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा विद्यमान पध्दतीने चलो स्मार्टकार्डच्या सहाय्याने देण्यात येणार आहे.

मासिक बसपास: २०० रुपये

त्रैमासिक: ६०० रुपये

सहामाही: १२०० रुपये

मुंबईबाहेरील बसमार्गांसाठी

मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेरील बससेवेवर अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेर पथकर (Toll) नाक्यावरून प्रवास करणा-या प्रवाशांकडून विनावातानुकूलित आणि वातानुकूलित बससेवांवर दोन रुपये अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.

ऑनलाईन पैसे भरणाऱ्यांना सवलत

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करणा-या प्रवाशांना प्रस्तावित बस पास सारणीमधील बसपासवर पाच टक्के इतक्या अतिरिक्त बसफे-या देण्यात येतील. व ‘वॉलेट स्वरूपात’ भरणा केल्यास, भरणा केलेल्या रकमेवर पाच टक्के इतकी अतिरिक्त भरणा देण्यात येईल. ही सवलत रोख रकमेने व्यवहार करणा-यास लागू राहणार नाही, असेही उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

सात वर्षांनी भाडेवाढ

बेस्ट उपक्रमाने २०१८ मध्ये भाडेवाढ केली होती. तेव्हा बेस्टचे किमान भाडे ८ रुपये होते. तर वातानुकूलित बसचे भाडे २० रुपये होते. त्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात केली होती. बेस्टचे साधारण बसचे भाडे पाच रुपये तर वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये इतके कमी करण्यात आले होते. बेस्टच्या भाड्यात कपात झाल्यामुळे बेस्टचे प्रवासी वाढले पण बेस्टचा महसूल घसरला होता. तसेच बेस्टकडे पाच रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती. २०१९ पासून बेस्टचे किमान भाडे पाच रुपयेच असून त्यात वाढ करावी अशी मागणी प्रशासनाकडून वारंवार होत होती. मात्र निवडणूकीच्या नावाखाली ही भाडेवाढ होऊ शकली नाही. बेस्टला मात्र भाडेकपातीमुळे प्रंचड तोटा सहन करावा लागला.