मुंबई : मुंबईकरांची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट सेवा अखेरच्या घटका मोजू लागली असून बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या फक्त २४९ बस शिल्लक आहेत. बेस्ट उपक्रमाद्वारे स्वमालकीच्या बस खरेदी न केल्यास येत्या काही काळात हा आकडा शून्यावर येऊन थांबेल. त्यानंतर बेस्ट उपक्रमाची धुरा ही भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर असेल. परंतु, भाडेतत्त्वावरील बसगाड्यांमुळे प्रवाशांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, बेस्ट प्रवाशांचे भविष्य धूसर होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत प्रवाशांना प्रवास करण्यासाठी नवनवीन वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होत आहेत. नवीन मेट्रो प्रकल्पामुळे प्रवासी वर्ग काही प्रमाणात त्याकडे वळाला आहे. परंतु, बेस्टचा प्रवासी वर्ग मोठा असल्याने, नवीन मेट्रो प्रकल्प किंवा इतर पर्यायी वाहतूक सेवा हा प्रवासी वर्ग सामावून घेऊ शकत नाही. तसेच इतर पर्यायी वाहतूक सेवेच्या तुलनेत बेस्ट सेवा स्वस्त आहे. तसेच गर्दीचा भार पेलणारी आहे. बेस्टने ९ मे २०२५ रोजी पासून तिकीट दरात दुप्पटीने वाढ केली.

याच दिवशी अॅक्वा लाईनचा आचार्य अत्रे चौकापर्यंत विस्तार केला. तर, ऑक्टोबर २०२५ पर्यंत कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे अशी पूर्ण मार्गावर अॅक्वालाईन सुरू झाली. बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ केल्यानंतर अनेक प्रवासी अॅक्वा लाईनकडे वळाले. मेट्रोचे भाडे कमी असल्याने या मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. परंतु, लांब अंतरासाठी बेस्टचा पर्याय प्रवासी निवडतात. त्यामुळे बेस्ट बसच्या संख्येत वाढ करणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या सुमारे २४९ बस आहेत. तसेच कंत्राटी २,४०० बस आहेत. तर, १५ वर्षे पूर्ण झालेल्या बस सेवानिवृत्त करून त्यांना भंगारात काढले जाते. त्यामुळे स्वमालकीच्या ताफ्यात हळूहळू घट होत राहील सप्टेंबर २०२३ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या १,५०० बस होत्या. तर, हा आकडा एप्रिल २०२४ पर्यंत १,१०० पर्यंत कमी झाला होता. नोव्हेंबर २०२५ पर्यंत २९८ आणि सध्या २४९ स्वमालकीच्या बस शिल्लक आहेत. त्यानंतर मार्च २०२६ पर्यंत २३५ आणि मार्च २०२७ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीचा ताफा उरणार नाही.

बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा २०२७ सालापर्यंत संपुष्टात आल्यानंतर प्रवाशांना मिळणारी स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी २,४०० बस आहेत. परंतु, या बसची देखभाल-दुरूस्ती योग्यप्रकारे होत नाही. तसेच या बसवरील कर्मचाऱ्यांना कर्तव्याप्रती योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी बस सेवेबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष आहे.

बसची संख्या वाढविण्यावर भर देण्याची मागणी

मुंबईतील प्रवाशांच्या संख्येनुसार मुंबईत बेस्टच्या साधारण १० ते १५ हजार बस अपेक्षित असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच, सध्या ५ ते ६ हजार बसचा ताफा वाढविल्यास प्रवाशांचा प्रवास वेगवान होण्यास मदत होईल. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने खासगी बसच्या संख्येत वाढ करण्याऐवजी स्वमालकीच्या बसच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.