मुंबई: बेस्ट उपक्रमाला येत्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून तब्बल १००० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या निधीमध्ये वाढ झाली आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगातून मिळणारा निधीही पालिकेला बसखरेदीसाठी दिला जाणार आहे. त्यापैकी २५० कोटी रुपयांचा निधीही दिला जाणार आहे.

बहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ऍण्ड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे दोन हजार कोटींची तूट भरून काढण्यासाठी अनुदानाची मागणी केली होती. त्यामुळे यंदा बेस्टला किती निधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. त्यानुसार पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी १००० कोटींची तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्षात बेस्टला ८०० कोटी रुपये देण्यात आले होते.

बेस्टला मदत करताना पालिका प्रशासन हात आखडता घेत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. मात्र सन २०१२ पासून बेस्टला तब्बल ११,३०४ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

येत्या आर्थिक वर्षात बेस्टला एक हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पंधराव्या वित्त आयागोकडून महापालिकेला देण्यात येणाऱया निधीपैकी ९९२ कोटी रुपये इतकी रक्कम विद्युत बसगाड्या खरेदीसाठी देण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ४९३ कोटींचा निधी पंधराव्या वित्त आयोगाकडून देण्यात आला असून त्यातील अडीचशे कोटी रुपयांची रक्कम देणे बाकी आहे. ती देखील बेस्टला दिली जाणार असल्याची माहिती गगराणी यांनी दिली. एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाच्या रकमेचा वापर कशासाठी करायचा ते बेस्ट प्रशासनाने ठरवावे. मात्र पंधराव्या वित्त आयोगाकडून आलेला निधी बसखरेदीसाठी वापरावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बेस्टचे विद्युत पुरवठा आणि परिवहन विभाग असे दोन विभाग आहेत. त्यापैकी विद्युत पुरवठा विभाग नेहमी नफ्यात असतो. मात्र परिवहन विभाग गेली अनेक वर्षे तोट्यात असून त्याची संचित तूट जवळपास आठ हजार कोटींवर गेली आहे. बेस्ट उपक्रमाने २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नोव्हेंबर महिन्यात सादर केला. बेस्ट प्रशासनाने ९४३९ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी त्यात २१३२ कोटींची तूट असून महापालिकेकडून अनुदान मिळेल या अपेक्षेवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी पालिकेकडून अनुदान मिळेल या गृहितकावर हा अर्थसंकल्प बेतलेला आहे. मात्र महापालिका बेस्टला किती अनुदान देणार यावर बेस्टचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. बेस्टने २०२६-२७ या आर्थिक वर्षात १०० टक्के बस विद्युत करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्य ठेवले आहे. तसेच पुढील वर्षी बेस्टचा स्वमालकीचा बसताफा ८००० बसगाड्यांपर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. मात्र बेस्टला किती अनुदान मिळते त्यावर बेस्टचे भवितव्य अवलंबून आहे.

Story img Loader