मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २,५५३ भाडेतत्त्वावरील बस असून यापैकी १,६८५ बस सुस्थितीत आहेत. मात्र ८६८ बस नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत उघडकीस आणली. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसचा प्रवास मुंबईकरांसाठी धोकादायक ठरत असून विविध अपघातात मृत्यू होत असल्याने संबंधितांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी यावेळी केली.
बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भाडेतत्त्वावरील बसची अवस्था दयनीय असल्याकडे समितीचे लक्ष वेधले. तसेच बेस्टच्या कंत्राटी बसची दुरुस्ती आणि नियमित देखभालीची जबाबदारी बेस्टच्या अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी अजय सिंह यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली. अलीकडील काळात कंत्राटी बसचे अपघात वाढले असून त्यामागे वेळेवर दुरुस्ती आणि योग्य देखभाल न होणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंत्राटी बसच्या देखभालीची जबाबदारी थेट बेस्टच्या अनुभवी अभियांत्रिकी विभागाकडे देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गेल्या सात महिन्यांत भाडेतत्त्वावरील बसचे अनेक अपघात झाले असून पादचाऱ्यांसह प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. भाडेतत्त्वावरील बसचे सतत अपघात होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी २१ मे २०२६ रोजी पत्राद्वारे बेस्ट उपक्रमाकडे केली होती. तब्बल तीन महिन्यांनंतर हरकतीच्या मुद्द्याचे उत्तर आले, परंतु इतिवृत्तान्तमध्ये काय नोंद करण्यात आली याची माहिती बेस्टने दिलेली नाही. तीन महिने झाले तरी कोणतीच कारवाई झालेली नाही, बस अपघातात नागरिक मृत्युमुखी पडत असून अधिकारी जबाबदार आहे की नाही, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला. अपघातात मृत्यू झाला तर संबंधितांविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नांदगावकर यांनी यावेळी केली. छोटी-मोठी दुरुस्ती केलेल्या ८६८ पैकी आता ९४ बसची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.
पाच हजार रुपये प्रतिदिन दंडाचे काय झाले
बस नादुरुस्त, संप काळात बस बंद पडल्या तर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रतिदिन प्रती एका बससाठी ५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत किती कंत्राटी बस व्यवस्थापना दंड आकारण्यात आला, याची माहिती द्यावी, अशी मागणी नांदगावकर यांनी यावेळी केली.
अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे
भाडेतत्त्वावरील बसचे अपघात वाढले असून अपघात टाळण्यासाठी उपक्रमाने प्रयत्न करावेत. अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कार्यालयात बसू नये, तर रस्त्यावर उतरून बसेसची तपासणी करावी, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिले.
