नव्या संगणकीय डय़ुटी पद्धतीविरोधात वाहक व चालक यांनी केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासनाला नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या संपामुळे तब्बल ४० लाख प्रवाशांना फटका बसला. साडेतीन हजार बसगाडय़ांपैकी सकाळी फक्त आठ आणि दुपारी फक्त दोन बसगाडय़ा रस्त्यांवर आल्या.
बेस्टच्या ताफ्यात सध्या ४२९० गाडय़ा आहेत. त्यापैकी साडेतीन हजारांहून अधिक गाडय़ा रोज रस्त्यावर असतात़ यासाठी बेस्टचे १३०६० चालक आणि १३५०८ वाहक कार्यरत असतात. दर दिवशी तिकीट विक्रीतून बेस्टला सरासरी ३ कोटी ६५ लाख ६० हजार एवढे उत्पन्न मिळते, तर प्रतिबस दर दिवशी ९८३१ रुपयांचे उत्पन्न मिळते. या साडेतीन हजार बसगाडय़ा रस्त्यांवर धावण्यासाठी दर दिवशीचा इंधन खर्च एक कोटीपेक्षा जास्त आहे.
मंगळवारी झालेल्या या संपामुळे एक कोटी रुपयांचा इंधन खर्च वाचला असला, तरी प्रवासी उत्पन्न सपशेल बुडाले. त्यातच बेस्टच्या एका बसगाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने बेस्टच्या गाडीचेही नुकसान झाले.

विद्यार्थ्यांचेही हाल
मुंबईतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बेस्ट प्रशासनातर्फे ३२१ शालेय फेऱ्या चालवण्यात येतात. मात्र मंगळवारी संपामुळे यापैकी एकही फेरी चालली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हाल झाले. सध्या परीक्षांचा काळ चालू असल्याने या बेस्टच्या फेऱ्यांवर विसंबून राहिलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

‘मेस्मा’अंतर्गत कारवाईची मागणी
मुंबई : बेस्ट वाहक-चालकांचा बेकायदेशीर संप सरकारने मोडून काढावा. मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या चालक-वाहकांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रिक्षाचालक रस्त्यावर उतरल्यावर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असे वक्तव्य करणारे बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांच्यावर देशपांडे यांनी टीका केली आहे. तसेच राव यांच्यावरही कारवाईची मागणी केली़