मुंबई : तंबाखूच्या अधीन गेलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या वैद्यकीय विभागाच्या ‘मॅजिक मिक्स’ या अनोख्या उपायामुळे आतापर्यत तब्बल पाच हजार कर्मचारी तंबाखूच्या विळख्यातून मुक्त झाले आहे. आज, शुक्रवार २९ मे रोजी पाच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे हे पाच कर्मचारी आपल्या इतर सहकाऱ्यांना तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
तंबाखूमुक्त बेस्ट’ हा कार्यक्रम २०१३ साली बेस्टने हाती घेतला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली. बस चालविताना किंवा कामावर असताना हातात तंबाखू मळल्याशिवाय कामच करावेसे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तंबाखूच्या आहारी गेलेल्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांची होती. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून वैद्यकीय विभागाने तंबाखू समान दिसणारा ‘मॅजिक मिक्स’ नावाचा पदार्थ तयार केला. २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम ओवा, २५ ग्रॅम दालचिनी आणि चार ते पाच लवंग यांचे मिश्रण करून पूड केली जाते. ही पूड तंबाखूप्रमाणेच थोडीशी जाडीभरडी असते. चुना म्हणून तांदळाच्या पावडरचा वापर केला जातो, अशी माहिती बेस्टचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल यांनी दिली.
चालक आणि वाहकांना तासनतास बसावे लागत असल्याने तंबाखूचे व्यसन जडते. २०१६-१७मध्ये सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रारंभिक सर्वेक्षणात ६५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी तंबाखूचे सेवन करत असल्याचे आढळले होते. या आधारे ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ आणि बेस्ट उपक्रमाने जनजागृती सत्रे, आरोग्य तपासण्या व व्यसनमुक्ती समुपदेशनासह उपचार सुरू केले. २०२५-२६ मध्ये पुन्हा केलेल्या १ हजार ८०० कर्मचाऱ्यांच्या नव्या सर्वेक्षणात २४९ नवीन तंबाखू सेवन करणारे कर्मचारी आढळले. या तपासणीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि स्थूलपणा यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाणही निदर्शनास आले. आतापर्यंत ६२ कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या तंबाखू सोडला असून सुमारे ४९ टक्के सहभागी कर्मचाऱ्यांनी तंबाखू सेवन सोडण्यात यश मिळवले आहे. कुलाबा, बॅकबे, रे रोड, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, कुर्ला, घाटकोपर, मरोळ, ओशिवरा, दादर यांसह १३ आगारांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या तपासणीमध्ये तोंडाच्या कर्करोगपूर्व लक्षणांची प्रारंभिक चिन्हे आढळली आणि एका प्रकरणात तातडीने बायोप्सीची गरज भासली.
बेस्टमधील ९० टक्के कर्मचाऱ्यांना तंबाखूचे व्यसन जडलेले आहे. यातील बहुतांश जणांचे व्यसन हे शारीरिकपेक्षाही मानसिकदृष्टया अधिक आहे. तंबाखू खातात त्याच पद्धतीने ‘मॅजिक मिक्स’ खाल्ल्यानंतर त्यांना समाधान मिळते. ‘मॅजिक मिक्स’मधील दालचिनी तंबाखूची नशा सोडल्यानंतर वाटणाऱ्या परिणामांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
