मुंबई : बेस्टच्या मजास आगारातील स्लॅबचा काही भाग गुरुवारी सकाळी कोसळला. या अपघातात बेस्टच्या ताफ्यातील मातेश्वरी कंपनीचे तीन कंत्राटी कर्मचारी (मेकॅनिक) जखमी झाले. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे बेस्टच्या आगारांच्या दयनीय स्थितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून आगार व चौक्यांचे स्थापत्यविषयक परीक्षण करण्याची मागणी बेस्ट समिती सदस्य (ठाकरे गट) नितीन नांदगावकर यांनी बेस्ट उपक्रमाकडे पत्राद्वारे केली आहे.

गुरुवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास मजास आगरात मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या ऑपरेटर्सच्या भांडार-विश्रांती कक्षातील स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला. या अपघातात अभियांत्रिकी विभागातील तीन मेकॅनिक जखमी झाले. जखमींवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. रियान शेख (वय १९), सलमान खान (२३), मुजमदिन खान (२०) अशी या दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत.

दरम्यान, उपक्रमातील सर्व आगार व चौक्यांची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. पाहणीदरम्यान विक्रोळी आगाराची अवस्था विशेषतः अत्यंत गंभीर व जीवितास धोका निर्माण करणारी असल्याचे नितीन नांदगावकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. विक्रोळी आगारातील सर्व कर्मचारी धोकादायक स्थितीत कर्तव्य पार पाडत आहेत.

या ठिकाणी जर स्लॅब कोसळून अपघात घडला, तर त्या अपघाताची जबाबदारी कोणाची असेल, हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाने अशा अपघाताची वाट पाहण्याऐवजी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे. आजपर्यंत बेस्टच्या आगारांचे स्थापत्यविषयक परीक्षण का करण्यात आले नाही, याचीही उपक्रमाकडे माहिती मागितली आहे. जर लेखापरीक्षण झाल्यास त्यानुसार कोणत्या उपाययोजना केल्या, याचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत देण्याची मागणी पत्रात केली आहे.

आगारांची स्थिती शहरात बेस्टचे एकूण २७ आगार आहेत. त्यापैकी ११ आगार ५० वर्षांपूर्वीचे असल्याने जीर्णावस्थेत आहेत. जवळपास सर्वच आगारात कर्मचारी व प्रवाशांकरिता पुरेशा सुविधा नाहीत. अनेक आगारांत कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधनगृह, बसण्याच्या जागाही उपलब्ध नाहीत. आगारांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.