मुंबई : बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या १५० डबलडेकर बसचा पुरवठा गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. वारंवार नोटिसा देऊनही कंत्राटदार बसचा पुरवठा करण्यात अपयशी ठरत असून एका महिन्यात प्रतिसाद न दिल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा बेस्टने कंत्राटदाराला दिल्याचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत सांगितले.

बेस्टने अडीच वर्षांपूर्वी आरामदायी प्रवासासाठी २०० डबलडेकर बसची ऑर्डर दिली होती. मात्र, आतापर्यंत त्यातील केवळ ५० गाड्या उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तर उरलेल्या १५० बसची प्रशासन केवळ वाटच पाहत आहे. उपक्रमाने कंत्राटदाराला नोटीसाही बजावल्या. मात्र ताफा ‘जैसे थे’च आहे. बसच्या पुरवठ्यास बराच विलंब होत असल्याने बेस्टला प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावर बस पुरविण्यात अडचणी येत आहेत. बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना बसकरिता बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. सध्या बसकरिता प्रतीक्षा कालावधी ५० मिनिटांवर पोहोचला आहे. त्यासाठी कंपनीला वारंवार मुदत देण्यात आली.

गेली दोन वर्षे नोटिसा दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने उपक्रमाने आता एका महिन्याची अंतिम मुदत कंत्राटदाराला दिली आहे. आता आणखी प्रतीक्षा न करता अंतिम मुदतीनंतर नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांहून अधिक काळ १५० बससाठी प्रतीक्षा केल्यानंतर आणि कायदेशीर सल्ला मसलत केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित केली आहे.

सुट्या भागांची किंमत वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम

‘बेस्ट’ने २०० एसी डबल डेकर बससाठी स्वीच मोबॅलिटी कंपनीसोबत करार केला होता. मात्र, २०१९ साली केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांसाठी, विशेषतः डबल डेकर बससाठी इलेक्ट्रॉनिक व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल युनिट बसविणे बंधनकारक केले. डबलडेकर बसच्या सुरक्षिततेसाठी हे युनिट उपयुक्त आहे. वाहने वळण घेताना, वाहनाच्या इंजिनला नियंत्रित करत असल्याने ते महत्त्वाचे आहे. मात्र, या उपकरणाची किंमत अधिक असल्याने आणि बसच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या किंमती वाढल्याने स्वीच मोबॅलिटीकडून उपक्रमाला गाड्यांचा पुरवठा झालेला नाही.

वातानुकूलित डबल डेकर बस या प्रामुख्याने दक्षिण मुंबई आणि कुर्ला पश्चिमेला, बीकेसी भागात चालविण्यात येतात. या बसला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते.