मुंबई : पावसाळ्यात बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागात विविध तांत्रिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पावसाळ्याकरिता तात्पुरते ६८६ नवघाणी (तात्पुरते) कर्मचारी घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच पावसाळ्यात वीजेसंबंधी समस्या सोडविण्यासाठी मदत केंद्राचीे (कॉल सेंटर) निर्मिती करण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमाचे वाहतूक आणि विद्युत असे दोन विभाग आहेत. विद्युतपुरवठा विभागात खोदकाम, पावसाळ्यात उपकेंद्रामध्ये केबल टाकणे, यंत्रसामग्रीची ने-आण करण्याची हंगामी कामे नैमित्तिक कामगारांद्वारे केली जातात. बेस्टचे शहरात १० लाख वीज ग्राहक आहेत. पावसाळ्यात वीज खंडीत होण्याच्या घटनांची संख्या जास्त असते. अशावेळी वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी बेस्टला मोठ्या प्रमाणात कर्मचारी लागतात. दरवर्षी बेस्टमधील सुमारे १५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटते आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये यासाठी बेस्टने यंदाच्या पावसाळ्यात विद्युतपुरवठा विभागात तातडीने ६८६ नवघाणींची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारिय विभागाच्या भरती विभागामध्ये प्रशासकीय आदेश ९४ अंतर्गत ३३६ आणि प्रशासकीय आदेश १५८ अंतर्गत ४३२ अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जाना प्राधान्य देऊन त्यातून ६८६ उमेदवारांची तात्पुरते नवघाणी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
विद्युतपुरवठा विभागाच्या मंजूर संख्याबळाव्यतिरिक्त आणखी २४५० तात्पुरती पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या विभागात २४०४ मंजूर पदांपैकी २२३३ कामगार (१९६२ कायमस्वरुपी आणि २७१ तात्पुरते) कार्यरत आहेत.
‘नवघाणी’ नाव बदला- नितीन नांदगावकर
बेस्ट उपक्रमाने ‘नवघाणी’ नाव बदलून त्याजागी चांगले नाव या कर्मचाऱ्यांना द्यावे अशी सूचना बेस्ट समिती सदस्य (ठाकरे) नितीन नांदगावकर यांनी केली. तसेच या कर्मचाऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याने त्यांना कायमस्वरुपी तत्वावर कामावर घेण्याची मागणी केली. ‘नवघाणी’ कर्मचारी खोदकाम करून केबल टाकण्याचे काम करतात. निवृत्त कर्मचाऱ्यांची आणि अनुकंपा तत्व यादीवरील उमेदवारांना नवघाणी कर्मचारी म्हणून घेण्यात येत असल्याचे यावेळी बेस्ट प्रशासनाने सांगितले.
बेस्टचे मदत केंद्र
बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहरात वीजपुरवठा करण्यात येतो आहे. पावसाळ्यात वीजेसंदर्भातील समस्या मोठ्या प्रमाणावर उद््भवतात. ग्राहक बेस्टच्या संपर्क क्रमांकावर फोन करतात. परंतु तेथे कोणीही कर्मचारी फोन घेत नाहीत. त्यामुळे ग्राहक वैतागतात. ही समस्या सोडविण्यासाठी बेस्टने २४ बाय ७ मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मदत केंद्रामध्ये सहा कर्मचारी कार्यरत असणार असून त्यांच्याकडे किमान सहा फोन असतील. बेस्टने पावसाळ्याचा आराखडा तयार केला असल्याची माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.
