मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वैद्यकिय विभागाच्या मधुमेहमुक्त कार्यक्रमाला मोठे यश आले आहे. या कार्यक्रमामुळे बेस्टमधील ३७० कर्मचाऱ्यांची मधुमेहातून सुटका झाली आहे. तर ३५० कर्मचाऱ्यांच्या गोळ्यांचे प्रमाण कमी झाले असून ७०० जणांची साखर नियंत्रणात आली आहे.
राज्यासह देशात मधुमेह ही एक गंभीर समस्या बनत आहे. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३ – २०२५ या कालावधीत राज्यातील ३० लाख ४९ हजार नागरिकांची तपासणी झाली. त्यातील २८ लाख ५५ हजार नागरिकांना मधुमेह झाल्याचे निदान झाले. म्हणजेच प्रत्येक दहाव्या व्यक्तीला मधुमेह आहे. बेस्ट उपक्रमाने नोव्हेंबर २०२२ पासून मधुमेहमुक्त कार्यक्रम हाती घेतला. बेस्टमधील २ हजार कर्मचारी मधुमेहाने त्रस्त आहेत. आता त्यापैकी ३७० कर्मचाऱ्यांची मधुमेहाची औषधे बंद झाली आहेत.
माझ्या ३० वर्षांच्या अनुभवात मधुमेह नियंत्रणात येत नसेल तर डॉक्टर औषधे बदलून देतात. अनेकदा रग्ण डॉक्टर बदलतात. परंतु मधुमेहचा खरा इलाज औषधांमध्ये नाही, तर विचार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे डॉ. अनिल सिंगल यांनी सांगितले. मधुमेह आज प्रत्येक वयाच्या व्यक्तिला होत आहे. मधुमेहामुळे हृयरोग,किडनी निकामी होणे, पक्षाघातासारखे गंभीर आजार होतात.
साखर, गुळ, मध, आंबा यासह गोड पदार्थ पूर्णपणे बंद करावे. आहारात फायबर आणि प्रोटिनचा समावेश करावा. रोजच्या जेवणात ज्वारी, बाजरीसारख्या मोठ्या धान्यांचा, भाज्या, डाळी, अंडी, सोयाबिन आणि दही घ्यावे. दररोज किमान १० हजार पावले चालावे. पुरुषांची कंबर ९० सेमी आणि महिलांची ८० सेमीपेक्षा अधिक असू नये.
खर्च ३० लाखांवरून साडेपाच लाखांवर
बेस्टचा २०२२ मध्ये मधुमेहाच्या गोळ्या आणि वैद्यकीय खर्च ३० लाख होता. मधुमेहमुक्त कार्यक्रमाच्या सुरुवातीनंतर गोळ्यावरील खर्च कमी झाला. हाच खर्च २०२५ मध्ये पाच – साडेपाच लाखांवर आला.
