मुंबई : पर्यटकांना ‘मुंबई दर्शन’ घडवणारी बेस्टची प्रसिद्ध ओपन डेक डबल डेकर बस सेवा एक प्रमुख आकर्षण होती. ही सेवा प्रामुख्याने दक्षिण मुंबईत चालवली जात होती. त्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावरून सफर करण्याचा आनंद घेत ऐतिहासिक इमारती पाहता येत होत्या.
या बसचे आयुर्मान संपल्याने आणि देखभालीच्या समस्यांमुळे ५ ऑक्टोबर २०२३ पासून ही सेवा अधिकृतपणे बंद करण्यात आली. बेस्टच्या महसूल वाढीसाठी कमीत कमी १० ओपन डेक डबलडेकर बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट कराव्या, अशी सूचना बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी प्रशासनाला केली.
बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने २६ जानेवारी १९९७ ला विनावातानुकूलित ओपन डेक बस सुरू केली होती. यामध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार होते. या बसमधून सुरुवातीला पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यात येत होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईमध्ये या बसच्या पर्यटनसेवेचा शुभारंभ करण्यात आला. बसच्या फेऱ्या संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.३०पर्यंत सुरू असायच्या. प्रत्येक महिन्याला साधारण २० हजार पर्यटक याबसमधून सफरीचा आनंद घेत होते. या बसमुळे बेस्टला अतिरिक्त महसूल मिळत होता.
मुंबईत एकेकाळी असणाऱ्या ओपन डेक डबलडेकर बसगाड्यांना मुंबईकरांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत होती. मात्र सध्या खासगी संस्थेच्या माध्यमातून केवळ एक ते दोन बसगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे महसूल वाढीसाठी कमीत कमी १० ओपन डेक डबलडेकर बस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट कराव्या, अशी सूचना बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी केली.
तीन ओपन डेक बस इतिहासजमा
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन ओपन डेक बस होत्या. १६ सप्टेंबर २०२३ रोजी पहिली, २५ सप्टेंबर २०२३ रोजी दुसरी आणि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी शेवटची बस सेवेतून बाद झाली. एका बसचे आयुर्मान हे साधारण १५ वर्षे असते. त्यामुळे मोटर वाहन नियमानुसार या बस मोडीत काढण्यात आल्या.
पर्यटकांना दक्षिण मुंबईची सफर
दक्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापिठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्म चौक, हॉर्निमल सर्कल, रिझव्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे ओपन डेक बसमधून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत होती. या बसच्या अप्पर डेकसाठी प्रतिप्रवासी १५० आणि लोअर डेकसाठी ७५ रुपये शुल्क आकारले जात होते.
