मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टमधून निवृत्त झालेले कर्मचारी हक्काच्या पैशांसाठी उपक्रमाकडे चकरा मारत आहेत. ग्रॅच्युइटी आणि अंतिम देयकांची रक्कम मिळावी यासाठी बेस्टचा एका सेवानिवृत्त कर्मचारी शहरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत आहे. लाडक्या बहिणींसाठी ३४४ कोटी, महापालिका-बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मात्र गेली ३० – ३५ वर्षे सेवा केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याची खंत या कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.

दीपक दत्तात्रय जुवाटकर बेस्ट उपक्रमात २३ मे १९९३ रोजी वाहक म्हणून रुजू झाले. १६ जानेवारी २०१२ रोजी परीक्षा पास होऊन शॉप रेकॉर्डर या पदावर त्यांची पदोन्नती झाली. एकूण ३२ वर्ष सेवा करून १ फेब्रूवारी २०२५ रोजी वयाच्या ५९ व्या वर्षी जुवाटकर सेवा निवृत्त झाले. निवृत्त होऊ दोन वर्ष झाली तरी जुवाटकर यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नाही. त्यांचे वडील ८७, तर आई ८२ वर्षांची आहे. पत्नी, मुलगा, सुनबाई, नातू असा परिवार आहे. महिन्याला

४ हजार ९८४ निवृत्ती वेतन मिळते. या तुटपुंज्या निवृत्ती वेतनात महिन्याचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न हताश जुवाटकरांना पडला आहे. मुंबईत विविध ठिकाणी जुवाटकर एकट्यानेच हातात फलक घेउन उभे राहतात. त्याच्या फलकावरील संदेश वाचून बेस्ट उपक्रमातीलच काय पण येणारा – जाणारा प्रत्येक जण स्तब्ध होतो. फलकावरील संदेश वाचतो आणि बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काची देणी मिळाली पाहिजेत, असे म्हणत पुढे निघून जातो.

सलग ३२ वर्ष मुंबईकरांची सेवा केली. मात्र आमच्या मेहनतीचाच पैसा आम्हाला भिकाऱ्यासारखा मागावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. १ ऑक्टोबर २०२४ पासून १ ऑक्टोबर २०२६ पर्यत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळालेली नाही. महापालिका, मंत्रालय, पोर्ट ट्रस्ट, नेव्हल डाॅक, गृह विभाग या सर्व सरकारी विभागांतून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युएटी व इतर थकबाकी सेवा निवृत्तीनंतर एका महिन्याच्या आत मिळते. लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी ३४४ कोटी निधी मंजूर करण्यात आले. महापालिका कर्मचऱ्यांना ३३ हजार बोनस जाहीर करण्यात आला. मग आमच्या हक्काची ग्रॅज्युएटी द्यायला सरकारकडे पैसा नाही का ?सेवा निवृत्तीनंतर अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले. आमचे निधन झाल्यावर हक्काची ग्रॅज्युएटी देणार का, असा उद्विग्न सवाल जुवाटकर यांनी केला.

हक्काच्या पैशांसाठी भीक मागायची का ?

वारंवार पाठपुरावा करून, आंदोलने करून, न्यायालयात जाऊनही सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी मिळत नाहीत. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी आता हक्काच्या पैशांसाठी भीक मागायची का, असा सवाल दीपक जुवाटकर यांनी उपस्थित केला.

बेस्टमधून २०२२ साली सेवा निवृत्त झालेल्या सुमारे साडेचार हजार कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, रजेचे रोखीकरण आणि इतर निवृत्ती लाभ प्रलंबित होते. त्यापैकी सप्टेंबर २०२४ पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली आहे.उच्च न्यायालयाचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे मिळण्याच्या विलंबावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले.

“आर्थिक चणचण हे कर्मचाऱ्यांची निवृत्ती देणी रोखण्याचे कारण असू शकत नाही “,, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला थकीत रक्कम तातडीने देण्याचे आदेश देत विलंबासाठी ९ टक्के व्याज देण्याचे निर्देशही दिले. उपक्रमाला या संकटातून बाहेर काढण्यासह कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात घोषित केलेल्या १ हजार कोटीपैकी ५०० कोटी रुपये बेस्टला दिले.