मुंबई : बेस्ट सेवानिवृत्त कामगार आणि अधिकाऱ्यांना त्यांची हक्काची देणी, उपदान (ग्रॅच्युटी) मिळालेली नाही. अनेक निवदने, आंदोलने करूनही अधिकाऱ्यांना देणी दिली नाहीत. दरम्यानच्या काळात १०० ते १५० कामगारांचे निधन झाले. त्यामुळे आता देणी मिळविण्यासाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार, अधिकारी ७ जानेवारी रोजी आझाद मैदानात चड्डी-बनियान आंदोलन करणार आहेत.
बेस्ट उपक्रमातील सुमारे ६,५०० हजार कामगार, अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२२ पासून उपदान व अंतिम देयक देण्यात आलेले नाही. त्यांची देणी मिळाली नसल्याने, काही कामगारांनी मुंबईत भीक मागो आंदोलन केले. तसेच बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधानांना निवेदन दिले. परंतु, अद्यापपर्यंत कामगारांना, अधिकाऱ्यांना देणी देण्यात आली नाहीत. बेस्ट उपक्रमात ३० ते ३५ वर्ष सेवा करून निवृत्त झालेल्या, कर्मचाऱ्यांना अजूनही झगडावे लागत आहे. करोना काळ, दंगल, अतिवृष्टी या आपत्तीजनक काळात बेस्टच्या कामगार, अधिकाऱ्यांनी जनतेची सेवा केली. परंतु, त्यांना हक्काची देणी मिळण्यासाठी आता आंदोलने करावी लागत आहे, असे बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.
