मुंबई : प्रवासी बसमधून उतरताच त्यांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी एक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार असून बेस्ट उपक्रमाने मुंबईत प्रथमच विजेवरील दुचाकी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरीत या सेवेची चाचणी होत आहे. ती यशस्वी झाल्यास संपूर्ण मुंबईत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे उपक्रमातर्फे सांगण्यात आले. अ‍ॅपआधारित विजेवरील दुचाकीसाठी एका कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त प्रवासी आणि उत्पन्न मिळावे यासाठी बेस्ट उपक्रमाने हा प्रयोग करण्याच निर्णय घेतला आहे. प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. यासाठी बेस्ट थांब्याच्या बाजूलाच दुचाकी उभ्या करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

अंधेरीत हा प्रयोग सुरू करण्यात आला असून संबंधित कंपनीकडून विजेवरील सात दुचाकी सध्या उपलब्ध आहेत. या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका असेल. प्रति तीन किलोमीटर प्रवास आणि मूळ भाडे २० रुपये असेल आणि दीड रुपये प्रति मिनिट आकारले जाईल. सध्या ही दुचाकी वापरण्यासाठी प्रवासी वोगो अ‍ॅपचा वापर करू शकतात. प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईत काही ठिकाणी सेवा सुरू केली जाणार आहे. कालांतराने ही सेवा बेस्ट चलो अ‍ॅपच्या माध्यमातूनही घेता येईल. तसेच बेस्ट बस पास आणि सुपर सेव्हर योजनेचे वापरकर्तेही दुचाकीही वापरू शकतील.

सध्या प्रायोगित सेवा कुठे?

सध्या अंधेरी पूर्व येथे डायनेस्टी बिझनेस पार्क, जेबी नगर मेट्रो स्टेशनजवळ, आकृती स्टार, चकाला औद्योगिक क्षेत्र, टेक्नोपोलिस नॉलेज पार्क, अंधेरीमधील बस स्टँड, आगरकर चौक बस स्टॉप, सहार रोड, रेल्वे कॉलनी या ठिकाणी विजेवरील दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.