भाऊबिजेच्या दिवशी, मंगळवारी मुंबईकरांची अडवणूक करण्याच्या हेतूने बेस्टच्या चालक-वाहकांनी सामूहिक रजा आंदोलनाचा विचार केला खरा पण त्यावरून जनमत विरोधात गेल्याचे दिसताच शनिवारी घूमजाव करत ‘मुंबईकरांना त्रास होऊ नये’ यासाठी सामूहिक रजा आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
बेस्ट प्रशासनाने सलग दुसऱ्या वर्षी बोनस नाकारल्यामुळे बसवाहक आणि चालकांनी भाऊबिजेच्या दिवशी सामूहिक सुट्टी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुंबईकरांना फटका बसू नये म्हणून हा निर्णय मागे घेतल्याचे  दि बीईएसटी वर्कर्स युनियनने जाहीर केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन कर्मचाऱ्यांना बोनस मिळू दिलेला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युनियनचे अध्यक्ष उदयकुमार आंबोणकर यांनी दिला आहे.