मुंबई : बेस्ट उपक्रमाने सुरू केलेल्या ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सेवेला एक महिना होत आला. मात्र या सेवेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत ११७ कार्डची विक्री झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. प्रवासात प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी १३ एप्रिल २०२२ ला एकच सामायिक कार्डह्ण प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले. यामधून तिकिटाचे पैसे अदा करून बेस्टबरोबरच मेट्रो, रेल्वेतूनही प्रवास करता येतो. देशभरात ‘एकच सामायिक कार्ड’ची सुविधा असलेल्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांसाठी बेस्टच्या या कार्डचाही वापर करता येणार आहे. शिवाय दुकाने, रेस्टॉरंट आणि ऑनलाईन यांसारख्या ठिकाणीही या कार्डचा वापर करता येणार आहे. परंतु कार्ड सेवेत आल्यापासून त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कार्ड सेवेत येताच पहिल्या सात दिवसांत ५८ कार्डची विक्री झाली. तर आतापर्यंत एकूण ११७ कार्डची विक्री झाली  असून ते २९१ वेळा रिचार्ज केल्याची माहिती देण्यात आली. तर याद्वारे ७७४ तिकिटे काढण्यात आली आहेत. या सेवेचा लोकार्पण सोहळा २५ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. सध्या मुंबईतील मेट्रो, तसेच मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेत ‘एकच सामायिक कार्ड’ सेवेची यंत्रणा नाही. रेल्वेत या कार्डाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ प्रयत्नशील असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.