आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असलेल्या बेस्टला ‘गती’ देण्यासाठी प्रशासनाकडून अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस गाडय़ांची कास धरली जात आहे. यासाठी इंधन आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस गाडय़ा दाखल केल्या जाणार आहेत. सुरुवातीला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत बेस्टला ५ इलेक्ट्रिक बस गाडय़ा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर बेस्टच्या ताफ्यातील सीएनजी बस गाडय़ा इलेक्ट्रिक बस गाडय़ांत रूपांतर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या बेस्टच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास ३० ते ३५ टक्के खर्च हा इंधनावर केला जातो. त्यात इंधनाच्या किमतीत होणारी वाढ बेस्टच्या खर्चात भर घालत असते. यावर उपाय म्हणून बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस गाडय़ा आणण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत आधार दिला जाणार आहे.
या बस गाडीत लिथियम बॅटरीला प्राधान्य दिले जाणार असून ही बॅटरी एकदा चार्जिग केल्यानंतर साधारणपणे एक बस गाडी १६० किमीचे अंतर कापू शकणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
तसेच सीएनजी बस गाडीचे रूपांतर इलेक्ट्रिक बस गाडीत करण्यास २५ ते ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी मुंबई महापलिकेकडून देण्यात येणाऱ्या १० कोटी रुपयांच्या आर्थिक निधीतून २५ ते ३० बस गाडय़ांचे रूपांतर करण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात बेस्टच्या इंधनाच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात बचत होईल, असे सांगितले जात आहे.

वैशिष्टय़े
’ देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च कमी
’ इंधनाची बचत
’ प्रदूषणाला आळा
’ तासाभरात बॅटरी चार्जिग
’सामान्य बस गाडीच्या रूपांतराचा खर्च कमी