मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी विकासात्मक कामे सुरू असून रस्ते अरुंद झाले आहेत. अशा रस्त्यांवर वाहतूक कोंडी अधिक होते. ऐनवेळी रिक्षा, टॅक्सी मिळत नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होतात. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीत बेस्टच्या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

दहावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत आणि बारावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहेत. या परीक्षांना मोठ्या संख्येने विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षेच्या काळात त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत .

विद्यार्थी आणि पालकांकडून विनंती आणि सूचना आल्याने परिस्थितीचे गांभीर्य राखून विभाग नियंत्रकाच्या सुचनेनुसार अतिरिक्त बस चालवण्यात येणार आहेत. वाहतुकीची जलद आणि सुरळीत व्यवस्था होण्यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे.

तसेच बस वाहक, बस चालक, बस निरीक्षक यांना विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागावे आणि आवश्यक ती मदत करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना बसच्या पुढील दरवाज्यातून प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात आली.