आधीच कमी झालेल्या ताफ्यातील ३०० बसगाडय़ा येत्या दोन ते तीन महिन्यांत भंगारात निघत असल्याने हवालदिल झालेल्या बेस्ट उपक्रमाने खासगी गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार चालवला आहे. या गाडय़ा भाडय़ाने घेऊन त्यावर बेस्टच्या चालक-वाहक यांची डय़ुटी लावून त्या चालवण्याचा विचार बेस्ट प्रशासन करत आहे. मात्र या विचाराला सत्ताधारी शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. बेस्टच्या अशा प्रकारच्या ‘खासगीकरणाचा’ मोठा फटका पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे हा विचारही बारगळण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या तब्बल ३०० गाडय़ांचे जीवनमान उलटून गेल्याने त्या भंगारात काढण्यात येणार असल्याचे गेल्या वर्षीच स्पष्ट झाले होते. पालिकेने बेस्टला नव्या बस खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही गेल्या आर्थिक वर्षांत दिला होता. मात्र बेस्टला नव्या गाडय़ा विकत घेणे अद्याप शक्य झालेले नाही. आत्ता त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून अशोका लेलँड आणि टाटा या दोन्ही कंपन्यांनी बेस्टच्या मागणीप्रमाणे नव्या गाडय़ा तयार होण्यास पुढील १४ ते २१ महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र एवढे महिने ३०० गाडय़ांची कमतरता भरून काढण्यासाठी बेस्टकडे सध्या एकच पर्याय आहे. याच पर्यायाचा विचार बेस्ट प्रशासनाने केला आहे. गाडय़ा रस्त्यावर आल्या नाहीत, तर प्रवाशांची प्रचंड गैरसोय होईल. ही टाळण्यासाठी वर्षभराच्या कराराने बेस्ट उपक्रम खासगी गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याच्या विचारात आहे. या गाडय़ा बेस्टच्या मार्गावर चालवण्यासाठी चालक आणि वाहक बेस्टचे असतील, अशा योजनेचा विचार चालू आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत खडाजंगी झाली.
बेस्टची ही योजना म्हणजे एक प्रकारे खासगीकरणाला आमंत्रण आहे. यामुळे बेस्टच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसेल. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये याचा फटका शिवसेनेला मोठय़ा प्रमाणात बसेल, अशी टीका शिवसेनेच्या सर्वच सदस्यांनी केली. प्रशासनाने नव्या गाडय़ा घेण्यासाठी पालिकेने निधी देऊनही बस खरेदी झाली नाही. हे कुठे तरी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी खेळले जाणारे राजकारण नाही ना, अशी शंका स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी उपस्थित केली. या शंकेचे खंडन करताना बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्याला कोणतेही राजकारण करायचे नसून बेस्ट उपक्रमाची भरभराट कशी होईल, हाच आपला हेतू असल्याचे स्पष्ट केले. नव्या गाडय़ा ताफ्यात येईपर्यंत काय काय उपाययोजना करता येतील, याची चाचपणी आपण करत असून लवकरच त्यावर मार्ग निघेल, असेही त्यांनी सांगितले.