मुंबई : थकीत वेतन न मिळाल्याने बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बस चालविणाऱ्या कंत्राटी चालकांनी शुक्रवारीही संप सुरूच ठेवला होता. त्यामुळे वडाळा, वांद्रे, विक्रोळी या तीन आगारांतून एकही बस सुटू शकली नाही. परिणामी, प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दुसऱ्या दिवशीही वेतनाचा प्रश्न न सुटल्याने बेस्ट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली असून भाडेतत्त्वारील बस व त्यावर चालक पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटना तसेच बेस्ट समितीच्या माजी सदस्यांनी केली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बस ज्या कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावरील घेण्यात येतात, त्यांच्याकडूनच चालक नेमले जातात. एम. पी. इन्टरप्रायजेस अॅरण्ड असोशिएटनेही बेस्टला भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा केला आहे. परंतु या कंपनीकडून नियुक्त चालकांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळालेले नाही. त्यामुळे चालकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला होता. या कंत्राटदाराची सेवा असलेल्या कुलाबा, वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, वडाळा आगारातील बस वाहतूक सेवा बंद झाली आणि प्रवाशांचे हाल झाले.
बेस्ट प्रशासनाने हस्तक्षेप करून कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले आणि चालकांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. परंतु शुक्रवारीही चालकांनी वेतनाच्या मुद्यावरून संप सुरूच ठेवला आणि सकाळपासूनच वांद्रे, वडाळा, विक्रोळी आणि कुर्ला आगारातून एकही बस सुटली नाही. जवळपास ५०० पेक्षा जास्त चालक संपात सहभागी झाले होते. परिणामी, प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही मनस्ताप सहन करावा लागला.
वांद्रे पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानकातून तसेच, कुलाबा, विक्रोळी येथून जाणाऱ्या तसेच या स्थानकापर्यंत येण्यासाठी बसच उपलब्ध नव्हत्या. अशीच परिस्थिती वडाळा यथेही होती. त्यामुळे मीटर रिक्षा आणि शेअर रिक्षा व टॅक्सींसाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागले. तर बस थाब्यांवरही प्रवासी बराच वेळ ताटकळत उभे होते. या संधीचा फायदा घेऊन काही शेअर रिक्षा चालकांनी भाडेदरात पाच ते दहा रुपये वाढ केली होती. वांद्रे पश्चिम ते रिक्लेमेशन, तसेच नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड, पाली हिल नाका, हॉली फॅमिली रुग्णालय, वडाळा रेल्वे स्थानक पश्चिम ते पार्कसाईट सूर्यानगर, हिदुस्थान कंपनी, गांधीनगर, गोदरेज कॉलनी, कन्नमवार नगर या भागातील प्रवाशांचे हाल झाले. या आगारातून जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या अंतरावरीलही गाडय़ा धावू शकल्या नाहीत. कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा केल्यानंतर दिवसभर सुरू असलेला कंत्राटी चालकांचा संप सायंकाळी मागे घेण्यात आला.
बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, एम. पी. ग्रुपच्या कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बस वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा, वांद्रे, कुलाबा आणि विक्रोळी या आगारांमधून एकही बस गाडी चालवण्यात आली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून १०४ जादा बस गाडय़ा प्रवर्तित केल्या. या कंत्राटदारविरुद्ध कंत्राटातील अटी आणि शर्तीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे बेस्टने स्पष्ट केले.
चालकांच्या मागण्या काय?
कंत्राटी चालकांना १६ ते १८ हजार रुपये वेतन मिळते. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतनच वेळेवर आणि नीट मिळत नव्हते. कधी निम्मे वेतन जमा करण्यात येत होते. सहा महिने उलटूनही कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीही देण्यात आलेला नाही. एक दिवस गैरहजर राहिल्यास साधारण १,८०० रुपयांपर्यंत वेतनातून पैसे वजा केले जात असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

१,८५० बस स्वमालकीच्या
१,८५० च्या बेस्ट उपक्रमाकडे सध्या ३,५८७ बस असून १,८५० बस स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील १,७१३ बस आहेत. जवळपास सहा कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा घेण्यात आल्या असून त्यावर कंत्राटी चालक आहेत.

कंत्राटदार चालकांचे वेतन व अन्य सुविधा देऊ शकत नाही. मग बेस्ट उपक्रमाकडून भाडेतत्त्वावरील बसपोटी देण्यात येणारे पैसे जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. चालकांचा संप झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झालेच, पण बेस्टचेही उत्पन्न बुडले. त्यामुळे उपक्रमानेही कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी.-रवी राजा, बेस्ट समितीचे माजी सदस्य

बेस्टमध्ये कंत्राटी बस आणि त्यांचे कंत्राटी कामगार आणून सत्ताधारी पक्षाने बेस्ट कर्मचारी, त्यांचे कुटुंब व बेस्टला संपवण्याचे षडयंत्र आखले आहे. त्यांचे वेतन व अन्य भत्ते मिळालेच पाहिजेत आणि तो त्यांचा हक्क आहे, मात्र बेस्ट प्रशासनही याकडे लक्ष देत नाही.-सुनील गणाचार्य, बेस्ट समिती, माजी सदस्य

बेस्ट उपक्रमातर्फे प्रत्येक कंत्राटदाराला महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ठरलेल्या रकमेच्या तुलनेत काही रक्कम आगाऊ देण्यात येते. असे असतानाही एम. पी. ग्रुपने बस चालकांचे वेतन गेल्या ३ महिन्यांपासून दिलेले नाही हे अतिशय खेदजनक आणि संतापजनक आहे. कंत्राटी बस चालवून बेस्ट प्रशासन कंत्राटदारांचे खिसे का भरत आहे? –रुपेश शेलटकर, अध्यक्ष, ‘आपली बेस्ट आपल्यासाठीच’


बेस्ट उपक्रमाकडून भाडेतत्त्वावरील बसपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना वेळेत पैसे दिले जात नाहीत, म्हणून कंत्राटदार चालकांना वेतन देऊ शकत नाही, असे करण्यात आले आहेत. मात्र हे आरोप खोटे आहेत. आम्ही त्यांचे पैसे वेळेत अदा करतो. कंत्राटदारांनी दाखविलेली हलगर्जी आणि बेस्ट वाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे नियमानुसार कंत्राटदाराला दंड ठोठावला जाईल. त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. – लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट