मुंबई : शहरातील मोठ्या निवासी इमारतींना टाटा पॉवरने वीजपुरवठा करण्यास सुरुवात केल्यानंतर जाग आलेल्या बेस्ट उपक्रमाने आता शहरातील वीजपुरवठा जाळे अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांची योजना हाती घेतली आहे. टाटा पॉवरने शहरातील उंच इमारतींना वीजपुरवठा करण्यासाठी उपकेंद्रे उभारली आहेत. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव वास्तव्यास असलेल्या वडाळा येथील दोस्ती ईस्टर्न बे हायराईजला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे.

बेस्टतर्फे शहरात परिवहन व वीज सेवा पुरविली जाते. बेस्ट बसमधून दररोज सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करतात. तर साडेदहा लाख वीज ग्राहक आहेत. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव वास्तव्यास असलेल्या ‘दोस्ती ईस्टर्न बे हायराईज’ला टाटा पॉवर वीज पुरवते. याच धर्तीवर बेस्टने या प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत. त्यामुळे शहरातील मोठ्या निवासी इमारतीचे ग्राहक बेस्टला मिळत नाहीत. विद्युत विभागाच्या अशा ढिसाळ कारभारावर तृष्णा विश्वासराव यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शहरातील वीजपुरवठा अधिक व्यापक करण्यासाठी बेस्टने खासकरून दक्षिण मुंबईतील व शहरातील मोठ्या निवासी इमारतीची शोधमोहीम सुरू केली आहे. बेस्टच्या पुरवठा क्षेत्रात पुढील दोन वर्षांत विजेची सर्वाधिक मागणी १,१०० मेगावॉटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी विजेची मागणी सुमारे ९००-९५० मेगावॉट होती. या उन्हाळ्यात विजेची मागणी १,०१० मेगावॉटच्या पुढे गेली होती. गेल्या वर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी सुमारे ९५० मेगावॉट होती.

१० उपकेंद्रांची निर्मिती

शहरभरातील जुन्या वीज वाहिन्या बदलण्यासाठी व नवीन उपकेंद्रे उभारण्यासाठी सुमारे २०० कोटींच्या पायाभूत सुविधा योजनेवर बेस्ट काम करत आहे. वीज वापरात होणाऱ्या अंदाजित वाढीची पूर्तता करण्यासाठी बेस्टला १० पेक्षा जास्त अतिरिक्त उपकेंद्रांची आवश्यकता आहे. ती सुमारे ५३० चौरस मीटर जागेत उभारण्यात येणार आहे. पूर्वी एका उपकेंद्रासाठी अंदाजे ९०० चौरस मीटर जागा लागायची. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पाच उपकेंद्रे तयार होण्याची अपेक्षा आहे. ही उपकेंद्रे वडाळा, अँटॉप हिल, शीव, काळबादेवी व गिरगाव येथे नियोजित आहेत.

जमीन शोधाचे आव्हान

उपकेंद्रांसाठी जमीन शोधणे हे बेस्टसाठी सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. वडाळ्यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात योग्य भूखंडांची उपलब्धता मर्यादित आहे. विकासक अनेकदा विद्युत पायाभूत सुविधांसाठी जमीन देण्यास टाळाटाळ करतात, विशेषतः अशा प्रकल्पांमध्ये व्यावसायिक वा निवासी जागेतून अधिक फायदा होतो.