मुंबई : बेस्ट उपक्रमाने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी, २२० मेगावॉट सौर ऊर्जा व ११० मेगावॉट, ४४० मेगावॉट-तास क्षमतेची ऊर्जा साठवण प्रणालीवर आधारित वीज खरेदीचा करार केला. या कराराद्वारे बेस्ट उपक्रमास २ रुपये ८७ पैसे प्रती युनिट या दराने २५ वर्षांच्या कालावधीसाठी हरित ऊर्जा उपलब्ध झाली. त्यामुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी ठेवण्यास साह्य होईल. तसेच यामुळे बेस्टचे वीज दर कमी ठेवण्यात मदत होईल.
बेस्ट उपक्रम व सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात सोमवार ३१ ऑगस्ट रोजी कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊसमध्ये या संदर्भातील करार झाला. करारावर बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी, तसेच सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अतुल्य नाईक व उप. महाव्यवस्थापक संजीव सिंह यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी बेस्ट उपक्रमाचे विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
कराराद्वारे बेस्ट उपक्रमास २ रुपये ८७ पैसे प्रती युनिट या दराने २५ वर्षांच्या कालावधीकरिता हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे, हरित ऊर्जेमुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी ठेवण्यास मदत होईल. ही नविनीकरणक्षम वीज महाराष्ट्रातील विविध नविनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प विकासक यांच्याकडून मिळविली जाईल. नविनीकरणक्षम ऊर्जा खरेदी दायित्वची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
सध्या ‘बेस्ट’ आपल्या एकूण १००० मेगावॉटच्या गरजेपैकी ३३ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून मिळवत आहे. या करारामुळे नविनीकरणक्षम ऊर्जा/हरित ऊर्जाचे प्रमाण ४३ टक्यांपर्यंत वाढेल. या वीजखरेदीमुळे बेस्ट उपक्रमास सायंकाळी विजेची मागणी सर्वाधिक असताना स्वस्त दरात वीज उपलब्ध होऊन विजेचे दर कमी ठेवण्यात मदत होईल.
