मुंबई : बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यासाठी खासदार नारायण राणे यांच्या समर्थ बेस्ट कामगार संघटनेने बुधवारी महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची भेट घेतली. त्यावेळी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बेस्ट कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन सेठी यांनी शिष्टमंडळाला दिले.

रखडलेला वेतन करा, ३३३७ गाड्यांचा बसताफा कायम ठेवणे, निवृत्त कामगारांची देणी त्वरित देणे, उर्वरित कोविड भत्ता लवकर देणे, बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे या प्रलंबित मागण्यांसाठी समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी महाव्यवस्थापकांची भेट घेतली. कुलाबा आगारामधील महाव्यवस्थापकांच्या दालनात संघटनेच्या शिष्टमंडळासोबत प्रदीर्घ चर्चेनंतर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरचिटणीस विलास पवार यांनी दिली.

या बैठकीच इतिवृत्तांत लवकरच कामगारांसमोर ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि आमदार नितेश राणे यांच्यासोबत लवकरच संयुक्त बैठक घेऊन कामगाराचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळी सेठी यांनी दिले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कामगाराच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

लवकरच वेतन करार करण्यासाठी कामगारांच्या सोयी-सुविधाच्या मागण्यांचे मागणीपत्र (चार्टर ऑफ डिमांड)) सर्व संबधित कामगार संघटनांकडून मागविण्याचे आदेश दिले. परिवहन आणि विद्युतपुरवठा विभागातील सामान्य कर्मचाऱ्यांची बढती करण्यात येईल, गैरहजेरीबाबत बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येईल, डिसेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन सभासद नोंदणी करण्यात येईल, दोन ते तीन दिवसांमध्ये त्या संदर्भात बेस्ट प्रशासन पत्रक काढणार आहे.

एटीओ पदासाठी गेले पंधरा वर्षे जे परीक्षा देऊन प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांची लवकरच सहाय्यक वाहतूक अधिकारी या पदावर नेमणूक करणार आहेत व त्यानंतर जर गरज भासली तर एटीओ पदाची परीक्षा होईल, असे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले. सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाची वयोमर्यादा ३५ वर्षे वरून ४५ वर्षे करावी या मागणीला महाव्यवस्थापकांनी होकार दिला असून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.