मुंबई : ”बेस्ट वर्कर्स युनियन”ने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. ‘बेस्ट वर्कर्स युनियन’ने सादर केलेल्या मागण्यांपैकी तीन मागण्यांबाबत शुक्रवारी झालेल्या शासन स्तरावरील समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बेस्ट प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रस्ताव आल्याने शुक्रवारी संध्याकाळी ”बेस्ट वर्कर्स युनियन”चे सरचिटणीस शशांक राव यांनी उपोषण मागे घेतले.

उपक्रमातील नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘बेस्ट वर्कर्स युनियन’ने आक्रमक भूमिका घेतली होती. बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मुंबईत मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांचा वेतन करार, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मूळ वेतनाची रचना, १ जानेवारी २००६ ते १ जानेवारी २०१६ पर्यंत काल्पनिक वेतन निश्चिती करून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचा २०१६ ते २०२१ व २०२१ ते २०२६ कालावधीसाठीचा प्रलंबित वेतन करार करावा, नैमित्तिक कामगारांची पुनः वेतन निश्चिती करणे, २०१० व त्यानंतर आजपर्यंत नवघणी पदावर कायम केलेल्या विद्युत पुरवठा विभागातील नैमित्तिक कामगारांना काल्पनिक वेतन निश्चिती करणे, कंत्राटी कामगारांना समान कामाला समान दाम लागू करणे, या मागण्यांवर उपक्रमाने सकारात्मक भूमिका घेतली असून बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी पुढील बेस्ट समिती सभेमध्ये युनियन समवेत चर्चा करण्याचे मान्य केले आहे.

मागण्यांच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन मुंबई महानगरपालिकेत मंजुरीसाठी सादर करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून सकारात्मक प्रस्ताव आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असल्याने शशांक राव यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे