मुंबई : ‘मागील अडीच वर्षांत तुम्ही सहकार्य केल्याबद्दल आभार. मला माझ्याच लोकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. माझ्याकडून कोणाचा अवमान झाला असेल, कोणी दुखावले असेल तर माफी मागतो, अशा भावना मंत्रिमंडळ बैठक संपताना व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे निरोपाचे भाषण केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारी ३० जूनला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा आदेश दिला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी सायंकाळी झाली. त्यात विश्वासदर्शक ठरावाचे अधिवेशन आणि शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील निर्णयाचे कामकाज संपल्यावर निरोपाची भाषा वापरली. पण त्याचबरोबर बाकीचे निर्णय पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली. काही मंत्र्यांच्या खात्याचे विषय राहिले आहेत. ते आपण पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ. गेली अडीच वर्षे तुम्ही जे सहकार्य केले आहे, त्याबद्दल धन्यवाद. मला माझ्याच लोकांनी दगा दिला म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरे जाऊ या. मागील अडीच वर्षांत तुम्ही सहकार्य केले, त्याबद्दल आभार. जर माझ्याकडून कोणाचा अवमान झाला असेल कोणी दुखावले असतील तर मी माफी मागतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

भेटण्यासाठी गर्दी

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात आल्यानंतर प्रवेशद्वारावर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते नमस्कार करत लोकांचा एकप्रकारे निरोप घेत होते. त्या वेळीही गर्दी झाली होती.