महाराष्ट्रासह मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे अशी सक्ती राज्य सरकारने केली आहे. कुठे जायचं आहे? किती पैसे होतील? अशी काही किमान प्रश्नांची उत्तरं तरी त्यांना देता आली पाहिजेत असा सरकारचा आग्रह आहे. महाराष्ट्रात राहायचं आणि पैसे कमावयाचे असतील तर इथली भाषा आली पाहिजे यासाठी सरकार आग्रही आहे. १५ ऑगस्टपर्यंत येथील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी आलं पाहिजे अशी मुदतही सरकारने दिली आहे. या अमराठी रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांची तयारी कशी सुरु आहे याबाबत इंडियन एक्स्प्रेसने आढावा घेतला आहे.
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांचे कसे प्रयत्न सुरु आहेत?
हजारो अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण ११ तास रिक्षा किंवा टॅक्सी चालवून पुढच्या रांगेत बसून मराठी शिकत आहेत. अक्षरं, शब्द यांची ओळख करुन घेत आहेत आणि मराठी शिकत आहेत. हे तेच हात आहेत जे दिवसभर स्टेअरिंगवर असतात आणि संध्याकाळी अक्षरं गिरवत असतात. यातले काहीजण असेही आहेत ज्यांनी त्यांच्या फोनलाच त्यांची शाळा केलं आहे. मनोरंजनाच्या रिल्स पाहण्यासह मराठी कसं शिकता येईल याकडे या सगळ्यांचा कल आहे. महाराष्ट्रातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आलं पाहिजे यासाठी १५ ऑगस्ट पर्यंतची मुदत राज्य सरकारने दिली आहे. १५ ऑगस्ट पर्यंत मराठी आलं नाही तर रिक्षा किंवा टॅक्सी चालक त्यांचं परमिट गमावण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे हे सगळेचजण कसोशीने मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजकीय पक्षांचीही तयारी
राजकीय पक्षांनीही अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी जोरदार तयारी केल्याचं दिसून येतं आहे. मुंबईत २ लाख ८० हजार अमराठी रिक्षा चालक आहेत तर २० हजार अमराठी टॅक्सी चालक आहेत. यातले अनेक जण हे मुख्यतः बिहार, उत्तर प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमधले आहेत. मराठी शिकलं नाही तर आपलं परमिट रद्द होईल याची भीती त्यांना आहे.
टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी काय सांगितलं?
टॅक्सी चालक शादाब कुरेशी हे ग्रँट रोड भागात टॅक्सी चालवतात. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी असलेल्या आशा हॉटेलमध्ये मी संध्याकाळचा चहा घेतो त्यानंतर मराठी शिकण्यासाठी जातो. त्याआधी सकाळी लवकर टॅक्सी चालवण्यास सुरुवात करतो. ११ तास टॅक्सी चालवल्यानंतर मी मराठी शिकतो असं शादाब कुरेशी यांनी सांगितलं. ग्रँट रोड येथील कामाठीपुरा भागात त्यांचं घर आहे. पण ते काम संपवल्यानंतर नागपाडा अहमद सेलर प्रायमरी शाळेत जातात. तिथे ते मराठी भाषा शिकून घेत आहेत. त्यांनी शाळा सोडून खरंतर ३० वर्षे झाली आहेत. पण आता मराठी शिकण्यासाठी पुन्हा शाळेत जाऊन बसतो असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. शादाब यांच्याप्रमाणेच ताजुद्दीन अन्सारी हे टॅक्सीचालकही मराठी भाषा शिकत आहेत. चला मराठी शिकूया या पहिल्या लेक्चरला शादाब आणि ताजुद्दीन अन्सारी यांची ओळख झाली. मुश्ताक आणि ऐनुल अत्तार या दोघांकडून हे मराठी शिकत आहेत. माझं नाव शादाब आहे, मी ग्रँट रोडमध्ये राहतो. मी टॅक्सी चालवतो. अशी वाक्यं हे दोघंही पाठ करत आहेत. मराठी व्यंजनं म्हणजेच क, ख, ग, बाराखडी, अक्षरलिपी याची ओळखही करुन घेत आहेत. मराठी बोलण्यासाठी शादाब आणि ताजुद्दीन दोघंही एकमेकांची मदत करत आहेत.
रजनीकांत तिवारींनी काय सांगितलं?
रजनीकांत तिवारी ५५ वर्षांचे आहेत. ते उत्तर प्रदेशातल्या जौनपूरहून मुंबईत आले आहेत. १९९० पासून ते मुंबईत रिक्षा चालवतात. ते म्हणाले की मला मराठी समजते. पण नीट बोलता येत नाही. मराठीत एखादा उच्चार चुकीचा झाला तर चूक व्हायला नको. आता मी मराठीत बोलायचा सराव हा माझ्या मुलीसह करतो आहे असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. शिव बाबू नावाचा चालक म्हणाला की मलाही मराठी येत नाही. पण मी युट्यूबवरच्या व्हिडीओवरुन भाषा शिकण्याचा प्रयत्न माझ्या परिने करतो आहे.
मराठी भाषेच्या आग्रहाबाबत मुंबईकर काय म्हणाले?
१) अनेक प्रवाशांचं म्हणणं हेच होतं की आम्हाला भाषेने तसा फार फरक पडत नाही. फक्त जो रिक्षा किंवा टॅक्सी चालक आहे त्याने आमच्याशी नीट बोलावं.
२) रिक्षा किंवा टॅक्सी चालक प्रामाणिक असला पाहिजे, त्याने योग्य ठिकाणी जाण्याचे योग्य भाडे आकारले पाहिजे.
३) रमेश यादव नावाच्या प्रवाशाने सांगितलं की माझ्यासह अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवास हवा असतो. तसंच जवळच्या अंतरावर जायला अनेकजण नाही म्हणतात ते नकोसंही होतं. भाषेच्या आग्रहापेक्षा हे महत्त्वाचं आहे.
४) युसुफ काँट्रॅक्टर या ५२ वर्षीय व्यावसियकाने सांगितलं की लोकांना चालकाला मराठी येतं का? यापेक्षा तो आपल्याला इच्छित स्थळी नीट नेईल का? याची काळजी जास्त असते. अनेक प्रवासी चालकाशी फार कमी बोलतात त्यामुळे भाषा हा मुद्दा महत्त्वाचा नाही.
५) वांद्रे या उपनगरातील राशी शेख या ३८ वर्षीय महिलेने सांगितलं की मुंबईत जे काम करायला येतात ते सगळेच इथे पोट भरतात. अशात लोकांवर कुठल्याही एका भाषेची सक्ती करायची म्हणजे थोडं अन्यायकारक आहे. कारण त्यावाचून फारसं काही अडत नाही.
