मुंबई : गेल्या वर्षी विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाबद्दल चौकशी समितीने मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर ठपका ठेवला होता. या कारणाबरोबरच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘एकाला चलो रे’ ही भूमिकाही जगताप यांना महागात पडली. माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना मराठी तसेच दलित चेहरा म्हणून पक्षाने संधी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड; पक्षात संघटनात्मक बदल

महापालिका निवडणुकीची तयारी भाई जगताप यांनी सुरू केली होती. महाविकास आघाडीतून लढण्यापेक्षा स्वबळावर काँग्रेसने लढावे या भूमिकेवर ते सुरुवातीपासून ठाम होते. पण मुंबईत पक्षाची ताकद फारशी वाढत नसल्याचे पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आले होते. त्यातच गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचे सारे खापर जगताप यांच्यावर फोडण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीत पक्षाची अधिकची मते मिळवून भाई जगताप स्वत: विजयी झाले पण पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार हंडोरे पराभूत झाले होते. दलित समाजातील हंडोरे यांचा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला होता. रमेश चेन्नीथाला यांनी केलेल्या चौकशीत भाई जगताप यांना जबाबदार धरण्यात आले होते.

हेही वाचा >>> विदर्भातील ओबीसी मतांवर सर्वपक्षीयांचा डोळा

जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्ष संघटनेत शैथिल्य आल्याने नेतृत्व बदल करण्याचा विचार गेले अनेक दिवस पक्षात सुरू होता. जगताप यांना हटविण्यात आल्यानंतर मराठी चेहराच अध्यक्षपदी नेमण्यात येणार होता. या दृष्टीने चाचपणी करण्यात आली. वर्षा गायकवाड यांना मराठी तसेच दलित चेहरा म्हणून पसंती देण्यात आली. मुंबई काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.

अध्यक्षपदी दुसरी जोडी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद मुरली देवरा आणि मिलिंद देवरा या पिता-पुत्राने भूषविले होते. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी अध्यक्षपद भूषविले होते. यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारी ही दुसरी जोडी आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhai jagtap remove as a mumbai congress chief due to chandrakant handore defeat in mlc polls zws
First published on: 10-06-2023 at 02:28 IST