मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी राज्यातील उद्योग, बेरोजगारी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग आलेला नाही. उलट अनेक उद्योग गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गेले,” असा दावा त्यांनी सभागृहात केला.
राज्यात आतापर्यंत २० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुक आल्याची घोषणा करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. मात्र, या घोषणांमधून प्रत्यक्षात किती उद्योग उभे राहिले, किती रोजगार निर्माण झाले आणि किती गुंतवणूक प्रत्यक्षात आली, याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बेरोजगारी आणि महिला सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. “महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आहे, तर बेरोजगारीतही राज्याची स्थितीक्रमांक दोन वर आहे . मग महाराष्ट्राला नेमके कुठे नेऊन ठेवले आहे?” असा सवाल त्यांनी सरकारला केला.
आपल्या दाव्यांवर ठाम राहून जगताप म्हणाले, “माझी आकडेवारी चुकीची असेल तर मी या सभागृहात माफी मागायला तयार आहे. पण मी जे बोलत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी बोलत आहे.”
