मुंबई : गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी भांडुप स्थानक परिसरात झालेल्या ”बेस्ट”च्या इलेक्ट्रिक बस अपघातातील आरोपी आणि बसचा चालक संतोष सावंत याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सावंत याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.
इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आपल्याला मिळाले नाही या सावंत याने केलेल्या युक्तिवादात सकृतदर्शनी तथ्य दिसून येते, असे निरीक्षण न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने त्याला जामीन मंजूर करताना नोंदवले. अटक झाल्यापासून सावंत हा गेल्या ११ महिन्यांपासून कारावासात होता.
पोलिसांच्या आरोपांनुसार, २९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातून सावंत हा इलेक्ट्रिक बस चालवत होता. परंतु, बस थांब्यावर प्रवासी बसची वाट पाहत आहेत हे माहीत असूनही, सावंत याने निष्काळजी आणि बेजबाबदारपणे बस भरधाव वेगाने चालवली. परिणामी, ती प्रवाशांवर जाऊन धडकली. दुसरीकडे, आवश्यक प्रशिक्षण न घेताच सावंत याला इलेक्ट्रिक बस चालवण्यास सांगण्यात आले होते. त्याने हे काम नाकारले असते, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असती किंवा त्याला नोकरीवरून काढून टाकले जाण्याची शक्यता होती, असे सांवत याच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्यात आले. सावंत याने हेतुपुरस्सर बस भरधाव चालवली किंवा तो मद्यपान अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली होता, असे दर्शवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयानेही सावंत याचा युक्तिवाद मान्य करून त्याला जामीन मंजूर केला.
बेस्ट” डेपो व्यवस्थापकाच्या पत्राची दखल
वर्षाच्या सुरुवातीला, ७ जानेवारी रोजी ”बेस्ट” डेपो व्यवस्थापकाने पोलिसांना पत्र लिहिले होते. या पत्राकडे न्यायालयाने आदेशात लक्ष वेधले. त्यात, सावंत याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण मिळाल्याचे कोणतेही प्रमाणपत्र उपलब्ध नाही. प्रशिक्षित चालकांच्या यादीतही त्याचे नाव नव्हते, असे नमूद करण्यात आले होते. तथापि, असे असतानाही ”बेस्ट” प्रशासनाने सावंत याला १ डिसेंबर २०२५ पासून ६०६ क्रमांकाच्या मार्गावर बस चालवण्याची परवानगी दिली होती, असे न्यायालयाने म्हटले. पुरेशा प्रशिक्षणाशिवाय याचिकाकर्त्याला बस चालवण्यास सांगण्यात आले आणि अखेरीस यामुळेच हा अपघात घडला, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
यापूर्वीही एकही अपघात नाही
सावंत २०११ पासून ”बेस्ट”मध्ये कार्यरत आहे आणि त्याच्या कारकीर्दीत यापूर्वी कोणताही अपघात झालेला नाही. शिवाय, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अंतर्गत नोंदवलेला कथित गुन्हा, सकृतदर्शनी कलम १०६ च्या कक्षेत येऊ शकतो. या गृन्ह्यासाठी कमाल पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, प्रकरणात ५६ साक्षीदार तपासले जाणार आहेत आणि खटला लवकर संपण्याची शक्यता नाही, असेही न्यायालयाने सावंत याला जामीन मंजूर करताना नमूद केले.
